नवी दिल्ली : थकीत कर्जभार असलेल्या रुची सोयावरील दावा अधिक भक्कम करताना पतंजली आयुर्वेदने आपली बोली २०० कोटी रुपयांनी वाढविली आहे. बाबा रामदेव प्रवर्तित कंपनीने रुची सोयाकरिता नव्याने ४,३५० कोटी रुपयांची बोली लावली आहे.

यापूर्वी, ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या प्रक्रियेत अदानी विल्मर सर्वात मोठी बोलीदार कंपनी होती. त्यावेळी पतंजलि आयुर्वेदने त्याला आक्षेप घेतला होता. रुची सोयाला कर्ज देणाऱ्या बँका पतंजलीच्या नव्या दाव्याबाबत येत्या आठवडय़ातील बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

इंदूरस्थित रुची सोयाने सुमारे १२,००० कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज थकविले आहे. त्याच्या वसुलीकरिता कंपनी नादारी आणि दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे. कंपनीकरिता पतंजलिने यापूर्वी ४,१६० कोटी रुपयांचा दावा केला होता. तो आता २०० कोटी रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

रुची सोयाकरिता यापूर्वी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकारणाने अदानी विल्मरच्या ६,००० कोटी रुपयांच्या दाव्याला मंजुरी दिली होती. तर पतंजलीची बोली ५,७०० कोटी रुपयांची होती. पतंजलीने अदानीच्या दाव्याला आक्षेप घेतला होता. त्यानंतर नव्याने बोली लावण्यात आली. मात्र प्रक्रिया रेंगाळत असल्याचे कारण देत अदानी त्यापासून लांब राहिली.

न्युट्रिला, महाकोष, सनरिच, रुची स्टार, रुची गोल्डसारख्या खाद्य नाममुद्रा असलेल्या रुची सोयाचे भारतात अनेक ठिकाणी निर्मिती प्रकल्प आहेत. कंपनीवर विविध बँकांचे १२,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे.