महाराष्ट्रासह सहा ठिकाणी खाद्य प्रक्रिया केंद्रे सुरू करणार

योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदने चालू आर्थिक वर्षांत १,१५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य राखले आहे. याद्वारे देशात सहा खाद्य प्रक्रिया केंद्रे आणि एक संशोधन व विकास केंद्र सुरू केले जाणार आहेत.

‘पतंजलि’ आयुर्वेदने २०१६-१७ करिता १०,००० कोटी रुपयांच्या व्यवसाय उलाढालीचेही उद्दिष्ट राखल्याचे रामदेव यांनी मंगळवारी सांगितले. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत ५,००० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली आहे.

कथित आरोग्या अपायकारक घटक आढळल्याने नेस्लेच्या मॅगी नूडल्सवरील बंदीनंतर पतंजलिच्या उत्पादनांना बाजारात अचानक मोठी मागणी मिळाली.

कंपनी गुंतवणूक करणार असलेल्या एकूण रकमेपैकी १५० कोटी रुपये हे संशोधन व विकास केंद्राकरिता असून नव्याने साकारण्यात येणारी प्रक्रिया केंद्र ही आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांमध्ये असतील, असे ते म्हणाले.

कंपनी नुकतीच दुग्धजन्य उत्पादन निर्मितीत उतरली आहे. तसेच खादीद्वारे वस्त्रप्रावरणे क्षेत्रातही येण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीची सध्या देशभरात ४,००० वितरक असून १०,००० दालने आहेत.