06 August 2020

News Flash

पीएसीएल गुंतवणूकदारांना परतफेड

पीएसीएलने १८ वर्षांच्या कालावधीत ६०,००० कोटी रुपयांच्या घरात निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला असल्याचा अंदाज आहे.

 

फसव्या योजनेतील २.७७ लाख लोकांना दुसऱ्या टप्प्यांतर्गत दिलासा

पीएसीएल लिमिटेडच्या फसव्या गुंतवणूक योजनेत पैसे अडकलेल्या २.७७ लाख गुंतवणूकदारांना प्रत्येकी ५,००० रुपयांपर्यंत परतफेड आजवर करण्यात आली आहे, असे भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने मंगळवारी जाहीर केले. शेती आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात पैसा गुंतवून दामदुपटीने परतफेडीच्या दाव्याला भुलणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा आहे.

पीएसीएलने १८ वर्षांच्या कालावधीत ६०,००० कोटी रुपयांच्या घरात निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला असल्याचा अंदाज आहे. बेकायदेशीरपणे ठेवी गोळा करण्याच्या या प्रकारावर सेबीकडून दट्टय़ा आणला गेला आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत फेडण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांची समिती नेमण्यात आली. या समितीने २ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१८ तसेच ८ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जुलै २०१९ असे दोन टप्प्यांत गुंतवणूकदारांचे पैसे फेडले आहेत.

पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २,५०० रुपयांपर्यंत परतफेडीचे दावे असलेल्या १,८९,१०३ गुंतवणूकदारांचे पैसे फेडले गेले आहेत. तर ताज्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी २,५०० रुपये ते ५,००० रुपयांपर्यंत रकमा असणाऱ्या २.७७ लाख गुंतवणूकदारांचे पैसे फेडण्यात आले आहेत, असे ‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

परतफेडीसाठी विहित नमुन्यात दावे दाखल करण्याचे ‘सेबी’ने पीएसीएलच्या गुंतवणूकदारांना केले होते. आणखी अनेक गुंतवणूकदारांचे ५,००० रुपयांपर्यंतच्या दावे अद्याप मंजूर होऊ शकलेले नाहीत. या गुंतवणूकदारांच्या नमुना अर्जात काही त्रुटी आढळून आल्याने त्यांचे दावे मंजूर होऊ शकलेले नाहीत, असे सेबीने स्पष्ट केले आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी नव्याने दावे अर्ज दाखल करण्याची संधी दिली जाईल आणि तशी घोषणा लोढा समितीकडून लवकरच केली जाणे अपेक्षित आहे.

पीएसीएल प्रकरणी सेबीने २२ ऑगस्ट २०१४ रोजी तिच्या प्रवर्तक व संचालकांना गुंतवणूकदारांचे सर्व पैसे तीन महिन्यात फेडण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर २०१५ रोजी कंपनीच्या आणि तिच्या नऊ प्रवर्तक व संचालकांच्या मालमत्तांवर जप्ती आणली. या मालमतांच्या लिलावातून जमा रकमेतून गुंतवणूकदारांचे पैसे फेडण्याची प्रक्रिया लोढा समितीने सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:04 am

Web Title: payback to pacl investors akp 94
Next Stories
1 ‘लार्ज, मिड कॅप’ गुंतवणुकीची हीच ती वेळ!
2 निर्देशांकांचा संमिश्र सप्ताहारंभ
3 वाहन विक्रीवाढीने पाठ सोडली
Just Now!
X