भारतातील ५५० जिल्ह्यंमध्ये शून्य अधिभारासह पेटीएमचा स्वीकार

पेटीएमने सोमवारी भारतातील ५५० हून अधिक जिल्ह्यंमधील ४१,००० हून अधिक पेट्रोल पंपांसोबतच्या भागीदारीची घोषणा केली. यामुळे रोकडरहित व्यवहार या यंत्रणेद्वारे होतील. दोन आणि चार चाकी वाहनाचे मालक त्यांच्या इंधनाची बिले शून्य अधिभारावर पेटीएमचा वापर करून भरू शकतील.

पेट्रोल पंपांवर आर्थिक व्यवहार करताना कार्डावरील शुल्क सवलत सोमवारीच जाहीर झाली आहे. त्यानंतर पेटीएमच्या रोकडरहित व्यवहार समाधानाचेही स्वागत होत आहे. देशाच्या ७०%हून जास्त पेट्रोल पंपांनी आधीच ही सुविधा सुरू केली असून या क्षेत्रात महिन्यापरत्वे २००% वाढ होत आहे.

याबद्दल पेटीएमचे वरीष्ठ उपाध्यक्ष, किरण वासिरेड्डी म्हणाले, आम्ही सध्या शून्य खर्चाची रोकडरहित सेवा ५०० जिल्ह्यंमधल्या ४१,००० पेट्रोल पंपांवर सुरू केली आहे. पेटीएम अ‍ॅप आता १० प्रादेशिक भाषांमध्ये आहे त्यात हिंदी भाषेचा देखील समावेश होत असून सर्वाना आता ‘डिजिटल पेमेंट’ करता येण्यासाठी हा उपक्रम आहे. कंपनीने १८०० १२३४ हा टोल फ्री क्रमांकदेखील सुर केला आहे.

वॉलेटधारकांना चेक बुक आणि डेबिट कार्ड सुविधा

पेटीएम पेमेंट बॅंकद्वारे वॉलेट वापरकर्त्यांना बॅंक खाते, चेक बुक आणि डेबिट कार्डसारखे अतिरिक्त लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पेटीएम वॉलेट खाती जी आत्तापर्यंत वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडद्वारे दिली जात होती ती आता नवीन स्थापना झालेल्या पेटीएम पेमेंट्स बॅंकने दिलेल्या पेटीएम वॉलेट खात्यांमध्ये स्थानांतरित झाली आहेत. ही प्रक्रिया कंपनीतर्फेच करण्यात येणार असून पेटीएम ग्राहकांना त्यांच्या आधीच्या पेटीएम वॉलेटसोबत असलेल्या सुविधांचा वापर करता येईल.