गुंतवणूकदारांसाठी यावर्षी पेटीएमने मोठी संधी उपलब्ध केली आहे. देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असणारी पेटीएम यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या आसपास देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणार आहे म्हणजेच भागविक्री करणार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार पेटीएमने आयपीओतून प्राथमिक बाजारातून ३ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २२,००० कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष ठेवले आहे.

पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सचे संचालक मंडळ आयपीओला मान्यता देण्यासाठी २८ मे रोजी बैठक घेणार आहे. या आयपीओद्वारे पेटीएमने आपले मूल्यांकन २५ ते ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच १.८० लाख कोटी वरुन ते वाढवून २.२० लाख कोटी रुपये करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पेटीएमच्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये वॉरेन बफेची बार्कशायर हॅथवे, जपानची गुंतवणूक असलेली कंपनी सॉफ्टबँक ग्रुप आणि चीनच्या अलिबाबा ग्रुपमधील अँट ग्रुप यांचा समावेश आहे. या आयपीओमध्ये नवीन शेअर्ससोबत कंपनी प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदाराद्वारे शेअर विक्रीसाठी ऑफर देतील जेणेकरुन काही कंपन्यांना यातून बाहेर पडता येणार आहे.

पेटीएमच्या आयपीओसाठी निवडलेल्या बँकांमध्ये मॉर्गन स्टेनली, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन यासारख्या गुंतवणूकदारांचा समावेश असणार आहे. मॉर्गन स्टेनली लीड मॅनेजर बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. या आयपीओसाठी प्रक्रिया जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते. दरम्यान, पेटीएम किंवा या गुंतवणूकदारांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

मार्केट रेग्युलेटर सेबीच्या नियमांनुसार आयपीओ आणणाऱ्या कंपनीला पहिल्या २ वर्षात १० टक्के तर पुढील ५ वर्षात २५ टक्क्यापर्यंत हिस्सा सामान्यांसाठी खुला करावा लागतो. म्हणजेच कंपनी जास्तीत जास्त ७५% हिस्सा स्वतः जवळ ठेऊ शकते.