मालमत्ता वैविध्यासाठी स्थानिक गुंतवणूकदार जागतिक गुंतवणुकीकडे वळलेले दिसत असल्याने फंड घराण्यांनी जागतिक गुंतवणूक करणारे फंड सुरू करण्यासाठी सेबीकडे परवानगी मागणारे अर्ज केले आहेत.

भारतीय भांडवली बाजार हे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक संपत्ती निर्मिती करत असले तरी भारतीय बाजारात निर्माण होणाऱ्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी भारतीय गुंतवणूकदार जागतिक आणि विशेषत: अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्या बाजाराकडे वळत असल्याचे दिसत आहे.

रुपया परिवर्तनीय नसल्याने भारतीय गुंतवणूकदार परदेशात थेट समभाग गुंतवणूक करू शकत नाहीत. भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडांचा पर्याय उपलब्ध आहे.

भारतीय म्युच्युअल फंड परदेशातील कंपन्यांतून गुंतवणूक करतात. जागतिक गुंतवणूक करण्याकडे भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता कल पाहून फंड घराण्यांनी या प्रकारचे फंड उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केले आहेत.

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या उत्पादन विभागाचे प्रमुख अश्विन पटनी यांनी लोकसत्ताला सांगितले की, भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध असली तरी भारतीय बाजारपेठ केवळ जागतिक शेअर बाजाराच्या तुलनेत एक छोटा अंश व्यापते. अमेरिकेतील फक्त ३ मोठय़ा सूचिबद्ध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे एकत्रित भांडवली मूल्य एकूण भारतीय बाजारच्या भांडवली मूल्यापेक्षा भारतीय भांडवली बाजाराच्या आकारापेक्षा जास्त आहे.

जागतिक गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी गुंतवणूकदारांना गेल्या १० वर्षांत अधिक जोखीम समायोजित परतावा दिला आहे.

गुंतवणूकदाराच्या जोखिमांकाला अनुसरून अनेक सल्लागार आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीचा थोडा हिस्सा जागतिक गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवायचा सल्ला गेल्या काही दिवसांपासून देत आहेत.

आमच्याकडे सध्या एकूण गुंतवणुकीचा काही हिस्सा परदेशात गुंतवणूक करणाऱ्या दोन योजना असल्या तरी नजीकच्या भविष्यात आमच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीत हिस्सेदार असलेल्या परदेशी गुंतवणूकदाराच्या सहयोगाने परदेशात गुंतवणूक करणारा फंड भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देऊ.

– अश्विन पटनी, उत्पादन विभाग प्रमुख, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड.