कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या घटकांचे उत्सर्जन नष्ट करण्यासाठी २०२० पर्यंत इंधनाच्या दर्जात देशपातळीवर सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी शिफारसतज्ज्ञांच्या पथकाने अहवालात केली आहे. हा अहवाल सरकारने स्वीकारल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रतिलिटर ७५ पैसे वाढ होण्याची शक्यता आहे.
‘ऑटो फ्युएल व्हिजन अ‍ॅण्ड पॉलिसी २०२५’ वरील सौमित्र चौधरी समितीने सदर अहवाल सादर केला आहे. युरो-पाच दर्जाचे पेट्रोल आणि डिझेल उत्पादित करण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्पांचे आधुनिकीकरण गरजेचे असून त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रतिलिटर ७५ पैसे वाढ केल्यास ही रक्कम उभी करता येणे शक्य आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
चौधरी हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य आहेत. युरो-४ उत्सर्जन निकष देशभरात २०१७ पर्यंत आणि युरो-५ दर्जा २०२० पर्यंत देशभरात प्राप्त झाला पाहिजे, असेही अहवालात म्हटले आहे. सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनऊ येथे युरो-४ प्रतीच्या इंधनाचा वापर केला जात आहे. तर देशभरात अन्यत्र बीएस-३ प्रतीच्या इंधनाचा वापर केला जात आहे.