सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गेल्या आठवडय़ात आकस्मिक केलेल्या इंधनाच्या किंमतकपातीमुळे देशभरातील पेट्रोल पंपचालकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून ते आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या आकस्मिक कपातीमुळे खरेदी दरापेक्षा कमी किमतीने विक्री करावी लागल्याने तोटा सोसावा लागल्याची अनेक पंपचालकांची तक्रार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेले काही महिने तेलाचे दर झपाटय़ाने घसरत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही सकारात्मक, तर काही नकारात्मक परिणाम होत आहेत. किंमत घसरणीचा लाभ थेट ग्राहकाला दिला जात आहे, तर काही वेळा अबकारी करात वाढीच्या रूपाने सरकारी तिजोरीतील तूट भरून काढण्याचे उपाय योजले जात आहेत; पण तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलची घाऊक खरेदी करून किरकोळ विक्री करणारे देशभरातील पंपचालक या अनिश्चिततेचे बळी ठरले आहेत. सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या १५ तारखेला किंवा महिनाअखेरीस या किमती जाहीर केल्या जातात. मात्र गेल्या आठवडय़ात एक दिवस उशिरा, १६ तारखेला मध्यरात्रीपासून तेल कंपन्यांनी अचानक किंमतकपात लागू केल्याने पेट्रोल पंपचालकांना कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.
१६ जानेवारीला जाहीर झालेली किंमतकपात त्याच दिवशी मध्यरात्रीपासून लागू करण्याच्या तेल कंपन्यांच्या निर्णयाचा देशभरातील पंपचालकांना दणका बसला आहे. एकूण नुकसान कोटय़वधी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा कयास आहे. त्यामुळे पंपचालकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून ते या मनमानीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या मन:स्थितीत आहेत. अशा प्रकारच्या किंमतकपातीबरोबरच दरवाढीच्या वेळी मात्र पंपचालकांना अचानक लाभ होत नाही काय, असे विचारले असता लोध म्हणाले की, गेले काही महिने सातत्याने होत असलेल्या दरकपातीमुळे अशी परिस्थिती निर्माणच झालेली नाही.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत सध्याची अनिश्चितता लक्षात घेऊन पंपचालक गरजेपुरताच खरेदी करतात, कारण कंपन्यांकडून खरेदी केलेल्या दरापेक्षा विक्रीच्या किमतीमध्ये घट झाल्यास पंपचालकांना तोटा सहन करावा लागतो. सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या १५ तारखेला किंवा महिनाअखेरीस या किमती जाहीर होत असल्यामुळे त्या तारखांनंतर जास्त खरेदी करण्याचे धोरण पंपचालकांनी अवलंबले आहे; पण चालू महिन्यात एक दिवस उशिरा, १६ तारखेच्या मध्यरात्रीपासून किंमतकपात लागू झाल्यामुळे त्या दिवशी केलेल्या खरेदीचा फटका पंपचालकांना बसला आहे. या एकाच दिवसात मला सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
-उदय लोध, अध्यक्ष,  फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन