तेल वितरणातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सप्टेंबरमधील पेट्रोल-डिझेलच्या मागणीतील वाढ पाहता, आगामी तिमाहीत ही मागणी करोनापूर्व पातळी पुन्हा मिळवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र काही विभागात मागणीचा स्थायी स्वरूपातील ऱ्हास पाहता, पूर्वनियोजित उत्पादन क्षमता विस्ताराच्या कार्यक्रमाचा फेरविचारही सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. चालू वर्षांत एप्रिलमध्ये देशव्यापी टाळेबंदीच्या काळात इंधन विक्री जवळपास ४६ टक्के गडगडली होती.

कंपनीच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित वेब-पत्रकार परिषदेत इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी पेट्रोल-डिझेलची मागणी अपेक्षेपेक्षा जलद गतीने वाढत असल्याचे सांगितले. सप्टेंबरमधील आश्वासक प्रवाह कायम राहिल्यास पुढील तीन महिन्यांत मागणी पूर्ववत पातळी गाठू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात डिझेलची विक्री महिनागणिक २२ टक्क्यांनी वाढली, तर पेट्रोलची विक्री महिनागणिक ९ टक्क्यांनी वधारली आहे. परंतु सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत डिझेल विक्री ९ टक्के तुटीची तर पेट्रोल विक्री वर्षांगणिक एका टक्क्याची वाढ दाखविणारी आहे. मात्र विमानाच्या इंधनाची मागणी केव्हा सुधारेल, हे सांगणे अवघड असल्याचे ते म्हणाले.

स्थानातरानंतरही ‘नाणार प्रकल्पा’चे भूसंपादन अडलेलेच

*  सौदी आराम्कोशी भागीदारी करून सरकारी तेल कंपन्यांकडून संयुक्तपणे प्रस्तावित पश्चिमी किनारपट्टीवरील तेल शुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथून हलविल्यानंतर, अद्याप त्याचे नवीन ठिकाण ठरलेले नसल्याचे इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले. रत्नागिरीत जनप्रतिरोधाचा सामना कराव्या लागलेल्या प्रकल्पाचे स्थलांतरणही भूसंपादनाच्या प्रक्रियेत अद्याप अडले आहे, असे त्यांनी सांगितले. उत्पादन क्षमता विस्ताराच्या फेरविचाराच्या प्रक्रियेत हा प्रकल्पच गुंडाळला जाईल काय, या प्रश्नाला वैद्य यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र २०२०-२१ साठी आखलेल्या २६,१४३ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या नियोजनाची पूर्तता होईल, असे ते म्हणाले.