आंतरराष्ट्रीय बाजारात ५० डॉलरच्याही खाली आलेल्या प्रति पिंप खनिज तेलामुळे भारतात पेट्रोल तसेच डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरिक्त पुरवठय़ामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर सोमवारी तर प्रति पिंप ४८ डॉलपर्यंत येऊन ठेपले. पंधरवडय़ापूर्वी तेलाचे दर ५५ डॉलर प्रति पिंप होते.देशातील आघाडीची सार्वजनिक तेल विक्री व विपणन कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) चे अध्यक्ष बी. अशोक यांनीही जागतिक स्तरावरील इंधन दराची नरमाई आगामी कालावधीतही कायम राहण्याची आशा व्यक्त केली आहे; मात्र हे दर  सध्याच्या स्तरावरच तूर्त स्थिर राहतील, यापेक्षा ते खाली येणार नाहीत, असा दावाही अशोक यांनी केला.
खनिज तेलाचे दर विद्यमान पातळीवर कायम राहतील, असे आपल्याला सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती व इंधन दराचा कल पाहता वाटते, असे अशोक म्हणाले. कमी होत असलेल्या खनिज तेल दरामुळे ग्राहकांसाठीही इंधनाचे दर आगामी कालावधीत आणखी कमी होतील, असे संकेत त्यांनी दिले.
अशोक म्हणाले की, भारतासारखा देश मोठय़ा प्रमाणात खनिज तेल आयातीवर निर्भर असून आपण एकूण मागणीपैकी तब्बल ८० टक्के इंधन आयात करतो. त्यामुळे त्याच्या किंमतीतील उतार हा अप्रत्यक्षरित्या वाढत्या खर्चात बचतीचा ठरत आहे. तेव्हा ग्राहकांसाठीही इंधनाचे दर नजीकच्या कालावधीत कमी होताना दिसतील.
खनिज तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता अशोक यांनी फेटाळून लावली. २०१४-१५ मध्ये तेल दर ४२ डॉलर प्रति पिंपपर्यंत घसरले होते. तर वर्षांतील त्याचा सर्वोच्च स्तर हा प्रति पिंप ११५ डॉलर होता. मात्र गेल्या वर्षीच्या पातळीवर यंदा तेलाचे दर येणार नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तेल यापूर्वी प्रति पिंप १४७ डॉलर असे सर्वोच्च टप्प्याला गेले आहेत.
जागतिक महासत्ता अमेरिकेतील खनिज तेलाचे उत्पादन वाढल्यापासून खनिज तेलाचे दर घसरत आहेत. यामुळे प्रमुख तेल उत्पादक आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र या देशांनी विद्यमान इंधन उत्पादन कायम ठेवण्याचे धोरण अंगिकारले आहे.