कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अथवा पीएफ खात्यांतील व्यवहारांना दिली गेलेली आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड कामगारांच्या दृष्टीने अधिक सत्वर व प्रभावी बनविताना, अर्जावर मालकांच्या मंजुरीन घेताही खात्यातील रक्कम काढता येणार आहे.
विद्यमान पद्धतीप्रमाणे, पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी खातेदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच, त्यांच्या मालकांकडून सांक्षांकित केल्या गेलेल्या अर्जावर अवलंबून राहावे लागत असे. परंतु ही पद्धत लवकरच नव्या सुविधेनुसार बदलणार आहे.
या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी पीएफधारकांनी वैश्विक खाते क्रमांक (यूएएन) मिळविलेले असावे तसेच ते बँक खाते आणि आधार क्रमांकांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)ऑनलाइन प्रक्रिया सुलभ केल्याने हे शक्य होणार आहे.
मालकांनी साक्षांकित केलेल्या अर्जाविनाही कर्मचाऱ्यांना निधी काढून घेण्यासाठीचा दावा ऑनलाइन पद्धतीने चालू आर्थिक वर्षांपासूनच करता येईल, असे मध्यवर्ती भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी स्पष्ट केले आहे.
आधार तसेच बँक खाते क्रमांकाची जोड असलेल्या भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना वैश्विक खाते क्रमांक – यूएएन पुरविण्यात येत असून, असा क्रमांक असलेले पीएफधारक निधी काढण्याच्या दाव्याकरिता अर्ज क्र. १९, १०सी तसेच ३१ अशा उपलब्ध नमुन्यात थेट अर्ज सादर करू शकतात, असे जालान म्हणाले. रक्कम काढण्यासाठी या धारकांना मालक कंपनीच्या साक्षांकिताची गरज लागणार नसल्याने ऑनलाइन प्रक्रिया अधिक जलद होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संघटनेतील रिक्त पदे भरणार
भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील रिक्त पदे भरण्यासह संघटनेची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. यामुळे धारकांना त्यांच्या निधीबाबतच्या तक्रारी, समस्या तसेच अडचणी त्वरित सोडविणे सुलभ होईल. या दिशेने संघटनेच्या मध्यवर्ती विश्वस्त मंडळाची बैठक येत्या ९ डिसेंबरला होणार आहे. विविध १२३ कार्यालयात २४ हजार मंजूर पदे आहेत. संघटनेला तातडीने ६ हजार जागा भरावयाच्या आहेत.