नुकसानीत असलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि अशा तोटय़ातील गुंतवणुकीतून बाहेर पडणेही जिकिरीचे बनल्याने निवृत्तनिधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘ईपीएफओ’ने देशभरात ६ कोटींहून अधिक कामगार-कर्मचाऱ्यांना २०१९-२० साठी मंजूर ८.५० टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने २०१९-२०साठी व्याजाचा दर ८.५ टक्के पातळीवर आणला आहे. आधीच्या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याजाचा दर कर्मचाऱ्यांना त्यांच्या ‘पीएफ’ रकमेवर मिळाला होता. यंदा व्याजदर घटलाच, शिवाय तो पूर्णत्वानेही जमा न होता, पहिल्या हप्त्यात ८.१५ टक्के  आणि उर्वरित ०.३५ टक्के  व्याज हे डिसेंबरमध्ये जमा करण्याचे निश्चित केले गेले आहे. ईपीएफओ विश्वस्तांच्या बुधवारी झालेल्या बैठकीने हा निर्णय संमत केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

करोनाचा कहर आणि टाळेबंदीमुळे, अनेक उद्योग-व्यवसायातील कर्मचाऱ्यांना वेतन कपातीला सामोरे जावे लागले असताना, गत सात वर्षांतील किमानतम पातळीवर असलेला व्याजलाभही विलंबाने आणि हप्त्याहप्त्याने जमा होण्याचा जाच त्यांना सोसावा लागणार आहे. तूर्त मिळणारे ८.१५ टक्के व्याज हे पारंपरिक निश्चित उत्पन्ना पर्यायातील गुंतवणुकीतून, तर डिसेंबरमधील उर्वरित ०.३५ टक्के व्याज हे भांडवली बाजारातील गुंतवणूक विकून देण्याचा निर्णय, कामगारमंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

नामुष्कीचे कारण काय?

* कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपश्चात तरतूद म्हणून ‘पीएफ’मध्ये जमा केलेल्या निधीवर चांगला परतावा देता यावा यासाठी भविष्यनिधी संघटनेने मोठय़ा विरोधानंतर भांडवली बाजारात आंशिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही गुंतवणूक केवळ एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफमध्ये करण्याचे ठरले. तथापि २०१८-१९ सालातील प्रतिकूल भांडवली बाजाराची स्थिती आणि त्यातही ईटीएफ योजनांच्या खराब कामगिरीमुळे मार्च २०२० पर्यंत या गुंतवणुकीतून अंदाजलेला ३,५०० कोटींच्या परताव्यापेक्षा, ही गुंतवणूक तोटय़ाचीच ठरल्याचे दिसून आले. डिसेंबपर्यंतही या गुंतवणुकीने अपेक्षित परतावा न दिल्यास काय? हा प्रश्न आहेच. तथापि  वार्षिक ८.५० व्याज देऊनही संघटनेकडे ७०० कोटी रुपये वरकड उत्पन्न राहते. आधीच्या वर्षांत ही रक्कम ३४९ कोटी रुपये होती.