७०० कामगारांवर संक्रांत

औरंगाबाद : औषध क्षेत्रातील फायझर कंपनीने सतत आर्थिक तोटा  होत असल्याचे कारण देत औरंगाबाद येथील उत्पादन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ७०० कामगारांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. देशभरातील दोन प्रकल्पांचे मूल्यमापन केल्यानंतर उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तास कंपनीच्या सूत्रांनी दुजोरा दिला. रोमा नायर यांनी कंपनीच्या वतीने पुरविलेल्या माहितीनुसार आर्थिक नुकसानीमुळे औरंगाबाद येथे उत्पादन करणे परवडत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयाची माहिती औरंगाबाद येथील उद्योग सहसंचालक कार्यालयास अथवा औद्योगिक विभागाकडे उपलब्ध नव्हती. या कंपनीला किती दिवसापर्यंतचे गुंतवणुकीचे लाभ मिळाले होते याची माहिती वरिष्ठ कार्यालयातच विचारावी लागेल, असे उद्योग सहसंचालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर एल- ८ मध्ये कंपनीच्या वतीने औषधी उत्पादन तयार केले जातात. येथे बनवली जाणारी सर्व औषधे निर्यात केली जात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या उत्पादनास बाजारपेठ मिळत नव्हती. परिणामी, केलेल्या मूल्यमापनानंतर चेन्नई व औरंगाबाद येथील उत्पादने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. ऑर्चिड या कंपनीकडून औरंगाबाद येथील उत्पादने हॉस्पिरा या कंपनीकडे देण्यात आली होती. या कंपनीने औरंगाबाद व चेन्नई येथील उत्पादक कंपन्या फायझरला विकल्या होत्या. येथील उत्पादने बंद करण्यात आली असली तरी देशभरातील गोवा व विशाखापट्टणम येथील कंपनीच्या कामावर त्याचा परिणाम होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. फायझरची उत्पादने भारतात तयार होतील, असा दावाही कंपनीच्या वतीने रोमा नायर यांनी पुरविलेल्या निवेदनामध्ये केला आहे. या निर्णयामुळे ७०० कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

‘‘सतत होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे सन २०१९मध्ये कंपनीने औरंगाबाद व चेन्नई येथील उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

– रोमा नायर, अधिक्त जनसंपर्क प्रमुख