पॉलिमर तसेच प्लास्टिक संबंधित भारतीय उत्पादनांना विदेशात मोठी मागणी असून मार्च २०१३ अखेर या क्षेत्रातील निर्यात १५ टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास ‘द प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’चे कार्यकारी संचालक राजन कल्याणपूर यांनी व्यक्त केला. भारताच्या ३०७ अब्ज डॉलरच्या एकूण निर्यातीपैकी प्लास्टिक निर्यातीने गेल्या वर्षांत ७.१ अब्ज डॉलरचा (२.३%) हिस्सा राखला आहे, असेही ते म्हणाले. दुबई येथे लोकप्रिय ‘शॉपिंग फेस्टिवल’च्या कालावधीतच होणाऱ्या ‘अरबप्लास्ट’ प्लास्टिक प्रदर्शनाचा लाभ यंदाच्या निर्यात वाढीस अनुकूल ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
एकटय़ा संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय प्लास्टिकची निर्यात ५.८ टक्के म्हणजेच ४ अब्ज डॉलरची होते. वाटा राखत असून डॉलरमध्ये ही रक्कम ४० अब्ज आहे. प्लास्टिक व्यापार क्षेत्रात जागतिक पातळीवर चीन, अमेरिकेनंतर हा भागाचा क्रमांक लागतो. भारतीय प्लास्टिक प्रक्रिया केंद्रे उभारणी आफ्रिका भागात वाढत असून या क्षेत्रातील यंत्रांची निर्यात २०११ मध्ये १७ कोटी डॉलरची होती. एकटा संयुक्त अरब अमिरात यामध्ये ३ टक्के, ४५ लाख डॉलरचा हिस्सा राखतो, अशी माहितीही देण्यात आली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय पुरस्कृत कौन्सिलच्या पुढाकाराने जानेवारीमध्ये दुबई येथे ‘अरबप्लास्ट’ हे प्लास्टिक विषयावरील प्रदर्शन होत आहे. यामध्ये भारतासह ११० देश भाग घेत असून ९०० हून अधिक प्रदर्शनकार असतील. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास २६ हजारांहून अधिक भेट देण्याची शक्यता असून यामध्ये १२१ भारतीय प्रदर्शनकार असतील, अशी माहिती प्रदर्शनाच्या आयोजन सेवा संस्थेचे सरव्यवस्थापक सतीश खन्ना यांनी दिली.