चढय़ा तेल किमती जागतिक विकासाला बाधक

नवी दिल्ली : वाढत्या इंधन किंमती या जागतिक विकासाला बाधक ठरत असल्याचे नमूद करत सौदी अरेबियासारख्या तेल उत्पादक देशांनी खनिज तेलाच्या किंमती माफक पातळीवर आणाव्यात असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारत तसेच विदेशातील तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करताना पंतप्रधानांनी हा इशारा येथे दिला. याबाबतच्या बैठकीला सौदी अरेबियाचे तेल मंत्री खालिद अल फलिह तसेच संयुक्त अरब अमिरातीतील मंत्रीही उपस्थित होते.

गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या खनिज तेलाच्या किंमती या जागतिक अर्थवेगाला अडसर ठरत असल्याचे नमूद करत मोदी यांनी सध्याच्या अस्थिर चलनमूल्यामुळे इंधन आयात बदल्यात द्यावयाच्या पैशाचा आढावा घेऊ, असेही सूचित केले.

बैठकीत आढावा घेताना पंतप्रधानांनी, तेल व वायू उत्खनन व उत्पादनात नव्याने गुंतवणूक होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. याबाबत सरकारचे प्रोत्साहन असूनही प्रत्यक्षात नवीन गुंतवणूक घडत नसल्याचे ते म्हणाले. देशात पुरेसे इंधन उत्पादन असल्याचे ते म्हणाले.

भारत हा जगातील चौथा मोठा इंधन आयातदार देश आहे. सौदी अरेबियाप्रमाणेच काही आखाती देशांमधून देश इंधन आयात करतो. अमेरिकेने येत्या महिन्यापासून लागू करावयाच्या तेल निबर्ंध देश – इराणमधूनही भारताकडून इंधन आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यातच भारतातही पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमती वाढत आहेत. चलन अस्थिरतेचाही इंधन दरांवर परिणाम जाणवत आहे.

देशाला लागणाऱ्या एकूण इंधनाापैकी ८३ टक्के गरज ही आयातीतून भागविली जाते. चालू वर्षांत आतापर्यंत १४.५ टक्क्य़ांनी घसरलेल्या रुपयामुळे इंधन आयात अधिक महागडी ठरत आहे.