शनिवारी आर्थिक आढावा बैठकीतून पंतप्रधान मोदींकडून मोठय़ा घोषणेची अपेक्षा

नवी दिल्ली : येत्या सप्ताहअखेरीस शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक आढावा बैठक योजण्यात आली असून, त्यात रुपयाची पडझड आणि वाढत्या इंधन दराच्या प्रश्नावर उतारा ठरेल, अशी घोषणा होणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेवर दाटलेले चिंतेचे मळभ दूर करण्यासाठी योजलेल्या बैठकीबाबत उत्सुकतेतून, बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणि भांडवली बाजारही सावरताना  दिसून आला.

देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी संकेत दिले. ही वार्ता दुपारनंतर सर्वत्र पसरली आणि चलन बाजारासह भांडवली बाजारातील व्यवहारांनी अकस्मात नाटय़मय कलाटणी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया ७२.९१ अशा सार्वकालिक नीचांकाला रोडावला होता, तो त्यानंतर दमदारपणे उसळी घेत ७० पैशांनी वधारलेला दिसून आला. तर ‘सेन्सेक्स’नेही ३०० अंशांनी उसळी घेतली.

केंद्रीय अर्थमंत्रालयातील अर्थव्यवहार विभागाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनीही, रुपयाचा मूल्य ऱ्हास अवाजवी पातळीखाली जाणार नाही आणि ते रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले. गर्ग यांनी ट्वीटद्वारे केलेल्या या वक्तव्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

रिझव्‍‌र्ह बँकेशी सल्लामसलत करून केंद्र सरकारकडून रुपयाची घसरण रोखण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या जातील, असेही संकेत आहेत. विदेशातून डॉलरचा ओघ वाढेल या दिशेने पाच वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेल्या अनिवासी भारतीयांसाठी ठेव योजनेची घोषणा होईल, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात शनिवारच्या आढावा बैठकीनंतर ही घोषणा होऊ शकेल. शिवाय, रिझव्‍‌र्ह बँकेने कठोर पतधोरणाची कास धरत व्याजदरात वाढ करण्याच्या उपायाचेही संकेत आहेत.

रुपया ५१ पैशांनी भक्कम

मुंबई : डॉलरच्या तुलनेत विक्रमी तळात पोहोचलेल्या रुपयाने बुधवारी अखेर डोके वर काढले. स्थानिक चलन थेट ५१ पैशांनी भक्कम होत ७२.१८ पर्यंत झेपावले. व्यवहारात ७३ नजीकचा तळ अनुभवल्यानंतर स्थानिक चलन सत्रअखेर ७२.१८ पर्यंत झेपावले.

बुधवारच्या सत्राची सुरुवात रुपयाच्या ७२.९१ खालील स्तराने सुरू झाली. त्याचा हा आतापर्यंतचा विक्रमी तळ होता.  चलनतळ सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक उपाययोजना करत असल्याबाबत केंद्रीय अर्थव्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिलेल्या माहितीचेही बळ गुंतवणूकदारांना मिळाल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात डॉलर खुले करीत मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपाची शक्यता सांगितली जाते. रुपया चालू वर्षांत आतापर्यंत १३ टक्क्यांपर्यंत रोडावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७९ डॉलपर्यंत गेल्याने चलनात अस्वस्थता नोंदली जात आहे.

‘ सेन्सेक्स’ची त्रिशतकी झेप

मुंबई : वाढते खनिज तेल आणि घसरता रुपया या हालचालींवर गेल्या सलग दोन व्यवहारांत मोठी निर्देशांक आपटी नोंदविणारा मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार बुधवारी काहीसा सावरला. स्थिरावत्या रुपयाने अखेर सेन्सेक्सही सत्रअखेर ३०४.८३ अंशांनी वाढून ३७,७१७.९६ पर्यंत पोहोचला. तर ८२.४० अंश वाढीमुळे निफ्टी ११,३६९.९० वर स्थिरावला. पोलाद, भांडवली वस्तूसारख्या क्षेत्रातील समभागांची बाजारात खरेदी झाली. सेन्सेक्समध्ये केवळ पॉवर ग्रिडचा समभाग घसरला. बाजारात गुरुवारी गणेश चतुर्थीनिमित्त व्यवहार होणार नाहीत.

महागाई दराचाही अनपेक्षित दिलासा

नवी दिल्ली : फळे, भाज्यांच्या किमतीत स्वस्ताई आल्याने ऑगस्टमधील किरकोळ महागाई दर १० महिन्यांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये ३.६९ टक्के नोंदला गेला आहे. महिन्याभरापूर्वी, जुलैमध्ये तो ४.१७, तर वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये ३.२८ टक्के होता. यापूर्वीचा किमान किरकोळ महागाई दर ऑक्टोबर २०१७ मध्ये ३.५८ टक्के होता. ऐन सणांच्या तोंडावर सावरत्या महागाई दराने दिलासा दिला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर निश्चितीकरिता ४ टक्क्यांखालील किरकोळ महागाई दर महत्त्वाचा ठरतो. तिची पुढील पतधोरण बैठक ५ ऑक्टोबरला महागाई दर आटोक्यात असल्याने संभाव्य व्याजदरातील वाढ टळेल काय, यावर आता सर्वाच्या नजरा असतील.