गुजरातेतील हझिरामधून अत्याधुनिक शस्त्र उत्पादन

मुंबई : तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, निर्मिती, संरक्षण क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेल्या ‘लार्सन अ‍ॅंड टुब्रो’ कंपनीने विकसित केलेल्या भारताच्या खासगी क्षेत्रामधील पहिले ‘आर्मर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्स’ (एएससी—संरक्षणकवच पद्धती संकुल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.

गुजरातमधील हाझिरा येथे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, ‘एल अ‍ॅंड टी’चे समूह अध्यक्ष ए. एम. नाईक आदी उपस्थित होते.

या संकूलामध्ये अत्याधुनिक रणगाडय़ांवरून मारा करणाऱ्या तोफा, लढाऊ लष्करी वाहने तसेच लढाऊ रणगाडय़ांची निर्मिती केली जाणार आहे. या संकुलातून सध्या ‘के ९ वज्र—टी’ या स्वयंचलित तोफांची निर्मिती केली जात आहे. संरक्षण खात्याने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत जागतिक पातळीवर बोली मागवित हे काम ‘एल अ‍ॅंड टी’ कंपनीकडे सोपविले होते.

‘एल अँड टी’च्या हाझिरा येथील ४० एकरच्या जागेवर हे संकुल वसविण्यात आले असून त्यात तोफखान्यांसह भारतीय लष्करातील इतर अत्याधुनिक शस्त्रे तसेच यंत्रसामग्रीची निर्मिती तसेच त्यांचे परीक्षण केले जाते.

संकुलामध्ये अवजड ऑफशोअर मॉडय़ुल, रिअ‍ॅक्टर एन्ड शील्ड्स, अणु ऊर्जा प्रकल्पांसाठी ‘स्टीम जनरेटर्स’, हायड्रोकार्बनसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, औष्णिक ऊर्जा आणि अल्ट्रा—क्लीन स्पेशल स्टील्सची निर्मितीही केली जाणार आहे.