पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

सेऊल : भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असून त्याच जोरावर नजीकच्या भविष्यात देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरच्या घरात पोहोचेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. वार्षिक सात टक्क्यांहून अधिक विकास दर गाठणारा जगातील भारत हा एकमेव देश असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

सुमारे २.५ लाख कोटी डॉलरसह भारत ही सध्या जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. दक्षिण कोरिया दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी गुरुवारी काही व्यावसायिक, उद्योगपतींची भेट घेतली. हय़ुंदाई, सॅमसंग, एलजी इलेक्ट्रॉनिकसारख्या ६०० हून अधिक कोरियाई कंपन्या भारतात व्यवसाय करीत असल्याचा उल्लेख करीत आणखी काही कंपन्या उत्सुक असल्याचे ते म्हणाले. या नवीन कंपन्यांपैकी काही या गुंतवणूक ताफ्यात सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले. व्हिसा तसेच व्यवसायाबाबत भारताचे धोरण शिथिल राहिल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. या जोरावरच देशात गेल्या चार वर्षांत २५० अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. अप्रत्यक्ष कर सुधारणेमुळे सुलभ व्यवसायाबाबत देशाचे स्थान जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानापर्यंत उंचावल्याचा उल्लेखही त्यांनी या वेळी केला.