मुंबई : दिवाळीच्या प्रारंभी निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षां बंगल्याबाहेर आंदोलन करण्यास गेलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांपैकी जवळपास दहा आंदोलकांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

पीएमसी बँकेचे खातेदार शुक्रवारी ‘काळी दिवाळी’ असे फलक हातात घेऊन महिलांसह वर्षां बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले आणि इथे बसता येणार नाही असे सांगितले. खातेदारांनी इथेच आंदोलन करणार असणार असल्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसविले आणि आझाद मैदान येथे सोडले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही वर्षां बंगल्याजवळ गेलो. तेथे आम्ही शांतपणे निषेध व्यक्त करणार होतो. परंतु लगेचच पोलिसांनी आम्हाला तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर सर्वाना ताब्यात घेतले आणि आझाद मैदानावर नेऊन सोडले. आम्ही चोर नाही आणि निषेध नोंदवणे हा आमचा अधिकार असल्याचे मत अंधेरीचे पीएमसी खातेदार सुमन चौहान यांनी व्यक्त केले. पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र काही महिला खातेदार संतप्त झाल्या आणि त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. लोक इथे मरत आहेत तरी आम्ही या विरोधात साधा निषेध सुद्धा व्यक्त करायचा नाही का, असा प्रश्न या महिलांनी यावेळी उपस्थित केला.

बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर पाच खातेदारांचा मृत्यू झाला आहे. येत्या ३० ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचा इशारा पीएमसी खातेधारकांनी दिला आहे.