मुंबई : कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन बँकेच्या प्रशासकाने बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेला दिले.

बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया व त्यांच्या दोन सहयोगी सदस्यांनी बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास तसेच डेप्युटी गव्हर्नर, मध्यवर्ती बँकेच काही वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.

बँकेचे ठेवीदार, भागीदार यांच्या संरक्षणार्थ सर्व त्या उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासकाने म्हटले आहे. बँकेचा ताळेबंद नव्याने तयार करण्यात येऊन त्यातून बँकेचे खरे रूप समोर येईल, असा दावाही करण्यात आला आहे.

आर्थिक चिंतेने बँकेच्या काही ठेवीदारांचा मृत्यू तसेच आत्महत्येच्या घटना घडत असताना बँकेच्या खातेदारांनी बुधवारी पुन्हा रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुंबई तसेच दिल्लीच्या कार्यालयासमोर संतप्त निदर्शने केली.

दरम्यान, बँकेचे एक माजी संचालक सुरजित सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी अटक केली.

महिन्याभरापूर्वी बँकेवर आलेल्या निर्बधानंतर बँकेत गैर व्यवहाराची कबुली देण्यात आली होती. या दरम्यान रक्कम काढण्यावरील मर्यादा शिथील करण्यात आली.