रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांसाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनं खातेदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून काही अटींच्या पार्श्वभूमीवर खातेदारांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या ४० हजारांच्या अटीव्यतिरिक्त ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना पैसे काढता न आल्यानं एका खातेदारानं आत्महत्या केली होती. तर एकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर मुलुंडमधील एका वृद्धाला उपचारासाठी रक्कम न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) अशी या खातेदारांची नावे आहेत. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. पीएमसी बँकेवर आलेल्या र्निबधांनंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने ते दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती त्यांच्या परिचितांनी दिली.

अशातच आता पीएमसीच्या खातेधारकांना त्यांच्या खात्यांतून रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या ४० हजार रूपयांच्या निर्बंधांव्यतिरिक्त ५० हजार रूपये काढता येणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. खातेदारांना शिक्षण किंवा वैद्यकीय उपचारांसाठी ही रक्कम काढता येणार आहे. यासाठी बँकेत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.