संकटग्रस्त पीएमसी बँकेला तारणारा आणि लाखो ठेवीदारांना दिलासादायी ठरेल, अशा तोडग्याची सार्वत्रिक अपेक्षा असताना, रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेतील घोटाळा पटलावर आल्याच्या वर्षपूर्तीला नव्या प्रशासकाच्या नियुक्तीची घोषणा मात्र केली आहे.

युनियन बँकेचे माजी अधिकारी ए. के. दीक्षित पीएमसी बँकेवरील नवीन प्रशासक म्हणून बुधवारपासून सूत्रे हाती घेतील. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर ‘कलम ३५ अ’नुसार निर्बंध आणणारी कारवाई करून, जे. बी. भोरिया या प्रशासकांच्या हाती बँकेचा कारभार सोपविला होता. भोरिया हे तब्येतीचे कारण देत मंगळवारी त्या पदावरून पायउतार झाले आहेत.  बँकेच्या ठेवींमध्ये वर्षभराच्या कालावधीत झालेला तीव्र ऱ्हास, करोना टाळेबंदी आणि अनेक कायदेशीर गुंतागुंतींमुळे थकीत कर्जाची वसुलीही रखडली असल्याने प्रशासकांच्या आजवर पीएमसी बँकेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना आजवर फारसे यश मिळू शकलेले नाही. खात्यातून सहा महिन्यांत केवळ १,००० रुपये काढण्याची प्रारंभी असलेली मुभा ही उत्तरोत्तर वाढत जाऊन ५०,००० रुपयांवर नेण्यात आली, इतकाच खातेदारांसाठी दिलासा ठरला आहे.