08 March 2021

News Flash

आठवडय़ाची मुलाखत : ‘पीएमएस’द्वारे २२ टक्क्यांपर्यंत परतावा शक्य

आठवडय़ाची मुलाखत : ‘पीएमएस’द्वारे २२ टक्क्यांपर्यंत परतावा शक्य

 

व्यक्तिगत गुंतवणूक सेवा अर्थात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस (पीएमएस) हे उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी गुंतवणुकीचे साधन आहे. सेबीच्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार पीएमएसमधील गुंतवणुकीने १२ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. याबाबत सांगताहेत आनंद राठी दलाली पेढीच्या पीएमएस विभागाचे उपाध्यक्ष मयूर शहा झ्र्

पीएमएस हा काय प्रकार आहे?

कोणत्याही बाजारपेठेत वेगवेगळ्या गरजा असणारे ग्राहक असतात. त्याप्रमाणे गुंतवणुकीच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या गरजा व कमी-अधिक जोखीम स्वीकारण्याची क्षमता असणारे ग्राहक आहेत. भांडवली बाजार नियंत्रक सेबीने याचा विचार करून उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी पीएमएस या गुंतवणूक साधनाला मान्यता दिली आहे. गुंतवणूकदाराची गरज लक्षात घेऊन पीएमएस सेवा देणारी संस्था त्यांच्या अशिलाच्या वतीने गुंतवणूक करीत असते.

 

पीएमएसमध्ये पोटभेद आहेत?

पीएमएसचे दोन उप प्रकार आहेत. पहिल्यात अशिलाचा समभाग निवडीत होकार विचारात घेतला जातो व दुसऱ्या प्रकारात फंड व्यवस्थापक सर्व निर्णय घेतो. शुल्करचनेतसुद्धा पोटभेद आहेत. पीएमएस सेवा पुरविणाऱ्या काही संस्था खाते स्थापना २ ते ३ टक्के शुल्क आकारतात. त्याला ‘फिक्स्ड फी स्ट्रकचर’ असे म्हणतात.  दुसऱ्या प्रकारात विशिष्ट परतावा मिळाल्यास शुल्क आकारले जाते. त्याला ‘व्हेरिएबल फी स्ट्रकचर’ असे म्हटले जाते.

एखाद्या गुंतवणूकदाराने त्याच्यासाठी पीएमएस किंवा म्युच्युअल फंड या पैकी नेमके कुठले साधन निवडावे?

गुंतवणूकदाराला गुंतवणुकीवरील परतावा व जोखीम याचा समतोल साधावा लागतो. पीएमएसमध्ये किमान २५ लाखांची रक्कम गुंतविणे आवश्यक आहे. सेबीने जे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी या गुंतवणूक साधनास मान्यता दिलेली आहे. म्युच्युअल फंडात सर्व गुंतवणूकदारांचा एकच पोर्टफोलिओ असतो. तसेच सेबीच्या नियमानुसार कुठल्याही एका कंपनीच्या समभागात कमाल गुंतवणूक करण्यावर मर्यादा आहेत. साहजिकच परताव्याच्या दरातदेखील फरक आहे. परतावा व जोखीम यांचा समतोल साधून गुंतवणूकदराने पीएमएस किंवा म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या योजना यामधून निवड करायची आहे.

 

पीएमएसमध्ये पारदर्शकता नाही, असे म्युच्युअल फंड समर्थकांचे म्हणणे आहे..

पीएमएस खात्यांची म्युच्युअल फंडाप्रमाणे रोज एनएव्ही जाहीर होत नसली तरी सेबीच्या नियमानुसार पीएमएस खातेधारकांच्या खात्यात महिन्याभरात झालेल्या व्यवहारांचे विवरण दरमहा सेबीला सादर करणे गरजेचे असते. तसेच या खात्यांचे सनदी लेखपालाकडून वार्षिक लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल खातेधारकास व त्याची प्रत सेबीला पाठवणे सक्तीचे आहे. केवळ रोज एनएव्ही जाहीर होत नाही म्हणून या व्यवहारात पारदर्शकता नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.

 

पीएमएसइच्छुक गुंतवणूकदारास एखाद्या पीएमएससेवा देणाऱ्या संस्थेचा मागील परतावा पडताळून पाहावयाचा असेल तर ते कसे पाहावे?

सेबी सर्व पीएमएस सेवा पुरवठादरांचे मासिक विवरण सेबीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत असते. तसेच पीएमएस हा प्रकार मुख्यत्वे एखाद्या सध्याच्या आशिलाच्या ओळखीने केला जाणारा असल्याने विद्यमान ग्राहक संदर्भ विचारू शकतो.

 

पीएमएसमधील परताव्याचे दर काय आहेत?

प्रत्येक अशिलाचा पोर्टफोलिओ हा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. साहजिकच एकाचा परतावा दुसऱ्यापेक्षा कमी-अधिक असणारच. याव्यतिरिक्त तुम्ही नेमकी केव्हा गुंतवणूक केली त्यावर ठरतो.

प्रत्येक पीएमएस सेवा पुरवठादार दोन किंवा तीन प्रकारची गुंतवणूक धोरणे राबवीत असतो. तुम्ही स्वीकारणार असणारी जोखीम, गुंतवणुकीची वेळ यावर हा परताव्याचा दर असतो. सर्व साधारणपणे १२ ते २२ टक्के दरम्यान परताव्याचे दर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:20 am

Web Title: pms investor
Next Stories
1 ‘पीएफ’ धारकांकरिता घरकुल योजना लवकरच!
2 आताच अमृताची बरसून रात गेली!
3 थेट विदेशी गुंतवणुकीत २०१६ मध्ये १८ टक्के वाढ
Just Now!
X