‘पीएनबी’चे नीरव मोदीला नवे आवतण

थकलेली कर्जफेड आणि फसवणुकीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ठोस तसेच अमलात आणता येईल असा आराखडा घेऊन या, असे ‘निमंत्रण’ पंजाब नॅशनल बँकेने हिरे व्यापारी नीरव मोदीला दिले आहे.

११,४०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेकडे फरार मोदीने कर्जफेडीकरिता मुदत मागितली होती. याबाबत त्याने बँकेला पाठविलेल्या ई-मेलला उत्तर देताना पीएनबीने नव्याने आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.

बँकेच्या आंतरराष्ट्रीय बँक विभागाच्या महाव्यवस्थापक अश्विनी वत्स यांच्या स्वाक्षरीने हा मेल पीएनबीने नीरव मोदीला पाठविला आहे.

मोदीला पाठविलेल्या ई-मेलमध्ये बँकेने म्हटले आहे की, तुम्हाला काही बँक अधिकाऱ्यांमुळे खोटी आणि गैररीत्या हमी पत्रे दिली गेली. तुमच्या भागीदारीतील तिन्ही कंपन्यांना आमच्या बँकेकडून अशी कोणतीही विस्तारित सुविधा दिली गेली नव्हती. बँकेकरिता दायित्व असलेली रक्कम अदा करण्याबाबतचे तुमचे वचन तुम्ही निर्धारित वेळेत पाळलेले नाही. रक्कम परत करण्याबाबत तुमच्याकडे नवा मात्र ठोस आराखडा असल्यास तो त्वरित सादर करा.

बँकेला पाठविलेल्या मेलमध्ये मोदीने, पीएनबीच्या कारवाईमुळे आपला व्यवसाय तसेच नाममुद्रेची हानी झाली असून रक्कम देण्याबाबतच्या आपल्या कार्यक्षमतेवरही विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, दायित्वाची पूर्तता करण्यासाठी बँकेकडे पुरेशी मालमत्ता असल्याचा पुनरुच्चारही पीएनबीने केला आहे. मोदीला दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी तपास यंत्रणांचे सहकार्य मिळत असून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे स्पष्ट करीत बँकेकडे वेळप्रसंगी दायित्वपूर्ततेकरिता पुरेशी मालमत्ता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.