पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सला कर्ज दिल्याप्रकरणी गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोच्चर आणि अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा यांना समन्स बजावले आहे. चंदा कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आज एसएफआयओसमोर हजर राहून पीएनबीच्या बनावट एलओयूना प्रतिसाद देत गीतांजली जेम्सला पाच हजार २०० कोटी रुपये कसे दिले याची माहिती द्यावी, असे समन्समध्ये म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी आरोपी आहेत. मेहुल चोक्सीच्या कंपनीला पाच हजार  २०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्यांमध्ये या बँकांचाही समावेश होता. तपासाबाबत या बँकांकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. कोच्चर व शिखा शर्मा यांनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधीने एसएफआयओच्या कार्यालयात हजर राहावे, असे समन्समध्ये म्हटले आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी सीबीआयने आणखी एकाला ताब्यात घेतले. गीतांजली समुहाचा उपाध्यक्ष विपूल चितालीया याला सीबीआयने ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तिथून त्याला वांद्रे – कुर्ला संकुलातील सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. विपूल चितालीयाचा या घोटाळ्याशी नेमका काय संबंध होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.