मुंबई : विहित कालावधीत पंजाब नॅशनल बँकेने कॅनरा-एचएसबीसी-ओबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीतील भांडवली हिस्सा विक्री पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे. पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की, बँकेने हिस्सा विकण्याच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली असून बँक आणि विमा क्षेत्राच्या नियामाकांची मंजुरी मिळाल्यानंतर समभाग विक्रीची औपचारिकता पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झाल्यामुळे कॅनरा-एचएसबीसी-ओबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीची मालकी पंजाब नॅशनल बँकेकडे आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने पीएनबी लाईफ इन्शुरन्स कंपनी प्रवर्तित केली आहे. विमा नियामाकाच्या आदेशांनुसार कोणीही भागधारक १५ टक्यांपेक्षा अधिक समभाग एकाहून अधिक विमा कंपनीत धारण करू शकत नाही. मागील आर्थिक वर्षांतील राष्ट्रीयकृत बँकांच्या विलीनीकरणामुळे अनेक बँका एकाहून अधिक विमा कंपन्यांत समभागांची १५ टक्कय़ांहून अधिक मालक झाल्या आहेत.

आंध्रा बँकेच्या यूनियन बँकेतील  विलिनीकारणामुळे यूनियन बँक यूनियन दाईची लाईफ इन्शुरन्स आणि इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स या दोन विमा कंपन्यांच्या भाग भांडवलात हिस्सा राखून आहे. या बँकांना विमा नियामकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत हा राखण्याची परवानगी दिली आहे.