स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने मुहूर्तमेढ रोवले जाणाऱ्या पहिल्या महिला बँकेच्या सात शाखांचे मंगळवारी एकाचवेळी उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राजधानीत मुख्यालय असलेल्या भारतीय महिला बँकेचा उद्घाटन सोहळा मुंबईत दुपारी नरिमन पॉईंट येथे होणार आहे. यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम आदी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईसह अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, लखनऊ आणि गुवाहाटी येथे प्रत्येकी एक शाखा १९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मार्च २०१४ पर्यंत बँकेच्या २५ शाखांचे उद्दीष्ट सरकारने राखले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी गेल्याच आठवडय़ात उषा अनंतसुब्रमण्यम यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली.  सर्व महिला कर्मचारी असलेल्या या बँकेला जून २०१३ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली. तर २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात बँकेसाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
भारतीय महिला बँक ही खऱ्या अर्थाने देशातील पहिली व्यापारी महिला बँक ठरणार आहे. भारतात ‘सेवा’ या महिला बँकेचे अस्तित्व सहकार क्षेत्रात गुजरातच्या माध्यमातून आले.
देशात अनेक खासगी, सार्वजनिक बँकांच्या सर्वोच्च स्थानावर महिला प्रतिनिधित्व आहे. अरुंधती भट्टाचार्य यांच्या रुपाने भारतीय स्टेट बँकेच्या जवळपास दोन शतकांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षपदी विराजमान झाली. गेल्याच महिन्यात त्यांची नियुक्ती झाली.