दक्षिण कोरियातील नामांकित पोलाद कंपनी असलेल्या पॉस्कोला अखेर पर्यावरण परवाना मिळाला असून ही कंपनी ओदिशा राज्यात ५२ हजार कोटींचा पोलाद प्रकल्प सुरू करीत आहे. पर्यावरण मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी सांगितले की, पॉस्को कंपनीला पोलाद प्रकल्प उभारण्यास गेल्या आठवडय़ात परवानगी दिली आहे. ओदिशातील पॉस्को पोलाद प्रकल्प सागर किनारी असलेल्या जगतसिंगपूर येथे ४००० एकर जमिनीवर उभारला जाणार आहे. दरम्यान या कंपनीला प्रकल्पासाठी परवाना देताना सामाजिक जबाबदारीच्या तत्त्वाअंतर्गत जास्त खर्च करण्याची अट घालण्यात आली असून त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ६० कोटी डॉलरवरून १२.६ अब्ज डॉलरवर गेला आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क गेऊन ह्य़े यांच्या भारतभेटीपूर्वीच ही परवानगी देण्यात आली. पॉस्को प्रकल्पात वर्षांला १.२ कोटी टन इतके पोलाद उत्पादन होणे अपेक्षित आहे. ओदिशातील या प्रकल्पात थेट परकीय गुंतवणूक असून तो २००५ पासून पर्यावरण परवाने व जमीन खरेदी अशा अनेक कारणास्तव रखडला होता.
पोलाद प्रकल्प व बंदर प्रकल्प असे पॉस्कोचे दोन प्रकल्प असून मोईली यांनी ते दोन वेगळे गृहित धरले व तूर्त पोलाद प्रकल्पाला परवानगी दिली आहे तर बंदर प्रकल्पास परवानगी दिलेली नाही. पॉस्कोच्या पोलाद प्रकल्पाला २००७ मध्ये प्राथमिक पर्यावरण परवाना मिळाला होता व अंतिम मंजुरी २०११ मध्ये मिळाली होती, पण त्यानंतर एक वर्षांने या प्रकल्पाला दिलेली परवानगी एका निम्न न्यायिक संस्थेने रद्दबातल ठरवली होती. त्यात त्यांनी पर्यावरणविषयक बाबींच्या आधारे परवानगी रद्द केली होती.