म्युच्युअल फंडाच्या कामगिरीमध्ये सुधारणा दिसून आली असून मागील एका वर्षांच्या कामगिरीनुसार, २९८ पैकी २४८ फंड सकारात्मक परतावा देत आहेत. तर स्मॉल कॅप फंडांनी सर्वाधिक ५३ टक्के नफा दिला आहे.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर जागतिक बाजारपेठांनी नवनिर्वाचित अमेरिकेच्या अध्यक्षांचे जोरदार स्वागत केले. जगभरातील बाजार निर्देशांक उच्चांकी पातळीवर बंद होताना दिसत आहेत. मागील एका आठवडय़ात ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स’मध्ये १० टक्के वाढ झाली आहे.

फंडांची कामगिरी सुधारत असताना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ आटल्याचे ‘अ‍ॅम्फी’ची ताजी आकडेवारी दर्शवते. गेल्या एक वर्षांत सर्वात मोठा लाभ हा मुख्यत: लार्ज कॅप आणि मल्टी कॅप फंडांना झालेला दिसत आहे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात २०० कोटी रुपयांचा ओघ नोंदला गेला असून सप्टेंबरच्या तिमाहीत नियोजित गुंतवणुकीच्या (एसआयपी) फोलिओत घट झाली आहे.

सोमवारी ‘अ‍ॅम्फी’च्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, समभाग फंडातील ओघ घमी होऊनही म्युच्युअल फंडांची मालमत्ता सार्वकालीन उच्चांकावर पोहोचलेली दिसत आहे.  सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये नियोजित गुंतवणुकीत ९ कोटींची वाढ होऊन गुंतवणूक ७,८०० कोटींवर स्थिरावल्याचे आकडेवारी सांगते. नियोजित गुंतवणुकीच्या नोंदणीत झालेली वाढ वगळता म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेतील वाढ म्युच्युअल फंडात वाढलेल्या ओघामुळे नसून मुखत्त्वे बाजाराच्या भांडवली मूल्यात झालेल्या वाढीमुळे असल्याचा निष्कर्ष विश्लेषकांनी काढला आहे.

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढले असून याचे मुख्यत्वे तीन कारणे आहेत. पहिले कारण सुज्ञ गुंतवणूकदारांना सध्याचे मूल्यांकन अर्थव्यवस्थेच्या वास्तवतेशी फारकत घेणारे वाटते. दुसरे म्हणजे, अनेकांचे रोजगार गेले असून वेतन कपातीमुळेही दैनंदिन खर्चाची जुळवणी करताना बचतीचा आधार घेत आहेत. अन्य गुंतवणुकीसोबत म्युच्युअल फंडातून ते बाहेर पडत आहेत. तिसरे कारण, समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी अपेक्षित परतावा दिलेला नाही. कोणत्याही कारणांनी गुंतवणूकदार गुंतवणुकीतून बाहेर पडले तरी फंड घराण्यांच्या मालमत्तेत आणि नफ्यात वाढ होत आहे. गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळण्यासाठी फंडांची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागणार आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांच्या पॅनकार्डधारकांची संख्या ७० लाख होती. ही संख्या आज तिप्पट झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी २०१४ ते २०१९ दरम्यान सुरुवात केली त्यात या नवगुंतवणूकदारांनी मोठी घसरण अनुभवली नव्हती. मार्चमधील घसरणीत मोठे नुकसान अनुभवलेले गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मूळ रकमेपेक्षा अधिक झाल्याचे दिसताच बाहेर पडत आहेत.

– हर्षांन चेतनवाला, मायवेल्थग्रोथ डॉटकॉम.