04 December 2020

News Flash

टपाल विभागाच्या ‘देयक बँक’ प्रस्तावाला केंद्राची मंजुरी

प्रस्तावित देयक बँकेचे आधिपत्य अनुभवी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे सोपविले जाईल

नव्या धाटणीची देयक बँक (पेमेंट बँक) सुरू करण्याच्या भारतीय टपाल विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देताना, ८०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करणारा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. सप्टेंबर २०१७ पासून ६५० शाखांसह बँकेचे कार्यान्वयन होणे अपेक्षित आहे.
भारतात सध्या १.५४ लाख टपाल कार्यालये असून, त्यापैकी १.३९ लाख हे ग्रामीण भागातील आहेत. त्यापैकी ६५० टपाल कार्यालयांतून पोस्टाच्या प्रस्तावित देयक बँकेच्या शाखा सुरू होतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
या प्रस्तावित देयक बँकेचे आधिपत्य अनुभवी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे सोपविले जाईल आणि निष्णात व्यावसायिकांद्वारे तिचा कारभार चालविला जाईल आणि टपाल विभाग, व्यय विभाग आणि आर्थिक सेवा विभाग या अन्य सरकारी विभागांचे बँकेवर प्रतिनिधित्व असेल, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
बँकेचा संपूर्ण आराखडा हा ८०० कोटी रुपयांच्या निधीत बसविला जाईल, ज्यापैकी ४०० कोटी रुपये हे भागभांडवल, तर ४०० कोटी रुपये हे अनुदान रूपात सरकारकडून दिले जातील. गत तीन वर्षांपासून या संबंधाने नियोजन सुरू असून, पण आता एका वर्षांच्या आत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

दृष्टिक्षेपात बँक नियोजन..
* सप्टेंबर २०१७ पासून ६५० शाखांमधून कार्यान्वयन
* ८०० कोटी रुपये खर्चाच्या नियोजनाचा आराखडा
* मार्च २०१७ पासून सर्व ‘ग्रामीण डाक सेवकां’ना हँडहेल्ड आधुनिक उपकरणे दिली जातील
* शहरी पोस्टमनना आयपॅड आणि स्मार्टफोन देण्याचा विचार

स्टेट बँकेपेक्षाही सरस जाळे..
टपाल कार्यालयांमध्ये बहुतांश संगणकीकरण आणि कोअर-बँकिंग जाळे विणले गेले असून, हे जाळे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेपेक्षाही मोठे आहे. स्टेट बँकेच्या १,६६६ शाखांमध्ये कोअर-बँकिंग प्रणाली आहे, त्याउलट २२,१३७ टपाल कार्यालये तत्सम प्रणालीद्वारे परस्परांशी जोडले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 7:58 am

Web Title: post offices to operate as banks network to be largest in world government
टॅग Arthsatta
Next Stories
1 देशात पहिला मॉडय़ुलर फोन दाखल; ‘एलजी’कडून दिल्लीत अनावरण
2 ‘कॉल ड्रॉप’संबंधी निकषात बहुतांश दूरसंचार कंपन्या नापास!
3 उद्योगानुकूलतेबाबत देशाच्या मानांकनात वेगाने चढ दृष्टिपथात – अर्थमंत्री
Just Now!
X