पीटीआय, नवी दिल्ली

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या छायेतून मुक्त होऊन निर्बंधात आलेली शिथिलता पाहता, देशातील विजेच्या मागणीतही १ ते १४ जुलै या पंधरवडय़ात १७ टक्क्यांची वाढ दिसून आली. या पंधरवडय़ात ५९.३६ अब्ज युनिट इतक्या विजेच्या मागणीची नोंद झाली, जी कोविडपूर्व पातळीलाही मागे टाकणारी आहे. जुलै २०१९ मधील याच पंधरवडय़ात, कोविडपूर्व काळातील वीज वापर ५२.८९ अब्ज युनिट असा होता.

आर्थिक आणि व्यावसायिक क्रियाकलाप हे निर्बंध शिथिलतेगणिक वाढत चालले आहेत, हेच विजेची मागणी आणि वापरातील वाढीची ही आकडेवारी दर्शविते, असा तज्ज्ञांचा होरा आहे. शिवाय अपेक्षेप्रमाणे जुलैपासून संपूर्ण देशस्तरावर विस्तारणाऱ्या मोसमी पावसाला यंदा उशीर झाला, या कारणानेही विजेची मागणी वाढल्याचे ते सांगतात. गेल्या वर्षांप्रमाणे चालू वर्षांतही एप्रिलपासून वाणिज्य आणि औद्योगिक वीज मागणीला स्थानिक स्तरावरील टाळेबंदीमुळे उतरती कळा लागली होती.