विजेच्या पारेषणातील सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न दर्जा प्राप्त असलेली कंपनी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.च्या मंगळवारपासून (३ डिसेंबर) प्रतिसमभाग ८५ ते ९० रुपये दराने सुरू होत असलेल्या भागविक्रीत ‘रिटेल’ या श्रेणीत मोडणाऱ्या किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना ५ टक्के (४.५० रुपये) सवलत देण्यात आली आहे.
या भागविक्रीतील ३५% हिस्सा ‘रिटेल’ श्रेणीसाठी राखीव असून, या गुंतवणूकदारांना प्रतिसमभाग ८५.५० रुपये दराने या भागविक्रीत बोली लावणारा अर्ज दाखल करता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १५० समभागांसाठी बोली लावता येईल आणि त्यापुढे १५० समभागांच्या पटीत अर्ज सादर करता येईल.
‘पॉवरग्रीड’ची २००७ सालच्या प्रारंभिक भागविक्री पश्चात योजलेली दुसरी भागविक्री आहे. २००७ साली प्रतिसमभाग ५२ रु. दराने प्रारंभिक खुल्या भागविक्री या कंपनीच्या समभागांचे शेअर बाजारात पदार्पण झाले, त्यानंतर २०१० मध्ये प्रतिसमभाग ९० रुपये दराने कंपनीकडून भागविक्री केली गेली आहे.
ताज्या भागविक्रीनंतर कंपनीच्या भागभांडवलातील सरकारचा वाटा ६९.४२ टक्क्य़ांवरून ५७.८९ टक्के इतका कमी होणार असून, भागविक्रीतून ७,५०० कोटी रुपयांची भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी ही भागविक्री शुक्रवार ६ डिसेंबपर्यंत खुली राहील.