कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक अखेर भांडवली बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ६ ऑगस्टपासून बाजारातील एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमार्फत (ईटीएफ) ५,००० कोटी रुपये गुंतविले जातील. निधीतील संचयित एकूण रकमेपैकी चालू आर्थिक वर्षांसाठीही ही रक्कम एक टक्का असेल. सध्या बाजारात निधीतील काहीही रक्कम गुंतविली जात नाही.
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी नवी दिल्लीत ‘अ‍ॅसोचेम’च्या व्यासपीठावरून या मोहिमेची शुक्रवारी घोषणा केली. मुंबईत केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होईल, असेही जालान म्हणाले. एसबीआय म्युच्युअल फंड ही निधी व्यवस्थापन कंपनी या निधीची सल्लागार म्हणून कार्य करणार आहे.
आमच्या नजरेसमोर भांडवली बाजारातील गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी असून या कालावधीत आम्हाला वाढीव लाभच मिळेल, असा विश्वास जालान यांनी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षांसाठी ५ टक्केरक्कम बाजारात गुंतविली जाणार असली तरी संघटनेकडे असलेल्या एकूण ६.५० लाख कोटी रुपयांच्या प्रमाणात ती एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचा दावा जालान यांनी या वेळी केला.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) नव्या गुंतवणूक कार्यक्रमाबद्दल केंद्रीय मंत्रालयाने एप्रिलमध्ये अधिसूचना जारी केली होती. यानुसार निधीतील किमान ५ ते कमाल १५ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक भांडवली बाजारातील समभाग अथवा समभाग निगडित योजनांमध्ये करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
संघटना व्यवस्थापनाने मात्र बाजारातील ईटीएफचा मार्ग त्यासाठी अनुसरण्याचे निश्चित केले असून निधीमध्ये महिन्याला जमा होणाऱ्या वाढीव रकमेच्या केवळ ५ टक्के रक्कमच चालू आर्थिक वर्षांसाठी बाजारात गुंतविण्याचे निश्चित करण्यात आले. एवढय़ा प्रमाणातील रक्कम गुंतवूनच ही मोहीम सुरू करण्यास संघटनेला केंद्रीय कर मंडळाची मंजुरी आहे.
एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाही दरम्यान संघटनेकडे महिन्याला जमा होणारी वाढीव रक्कम ८,२०० कोटी रुपये आहे. त्यामुळे संघटनेला ईटीएफमध्ये महिन्याला ४१० कोटी रुपयेच गुंतविता येणार आहेत.