गुंतवणूकदारांसाठी ‘फ्रीडम एसआयपी’चा पर्याय; गरजेनुरूप बंद-सुरू करता येणारा मोटार विमा

सध्याच्या करोना विषाणूजन्य साथीमुळे एकंदरीत अनिश्चिततेची स्थिती पाहता, जनसामान्यांपुढे त्यांनी आखलेल्या आर्थिक नियोजनाप्रमाणे वाटचाल सुरू ठेवावी की नाही, असा प्रश्न आहे. म्हणजे विम्याचे संरक्षण सुरू ठेवायचे काय, त्याचप्रमाणे वेतनकपात आणि प्रसंगी नोकरीची स्थितीही अशाश्वत असताना, ‘एसआयपी’ करण्यासाठी पैसे नसण्याचा प्रसंग ओढवू शकतो. म्हणून अशा प्रसंगांसंबंधाने ‘लवचीक’ असणाऱ्या वित्तीय उत्पादनांना पसंती मिळताना दिसत आहे.

विद्यमान असामान्य स्थितीची दखल घेत, एडेल्वाइस जनरल इन्शुरन्सने विमाक्षेत्रात एका अनन्य मोटर विमा योजनेची प्रस्तुती केली आहे. ही मोबाइल अ‍ॅपआधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी असून, गरजेनुसार ही विमा पॉलिसी चालू आणि बंद करता येणारी सुविधा तीमध्ये आहे. शिवाय ‘जेवढे वापराल तेवढे देय’ अशा धर्तीवर ग्राहकांना वाहन-वापराच्या दिवसाचाच हप्ता भरावा लागेल.

तर करोना कहराचा म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणुकीच्या नियोजनात मोडता येण्याचा संभव आहे, हे पाहता आयसीआयसीआय प्रूडेन्शियलचे ‘फ्रीडम एसआयपी’ हे वैशिष्टय़ खासच उपयुक्त ठरते. कोणत्याही आकस्मिक संकटांची गुंतवणुकीच्या शिरस्त्याला कायमस्वरूपी बाधा न येता, ठरलेल्या आठ, १०, १२ अथवा १५ वर्षांच्या दीर्घकालीन योजनेत सातत्य राखणे ‘फ्रीडम एसआयपी’ने शक्य बनते, असे मुंबईस्थित गुंतवणूक सल्लागार वैदेही बाम यांनी सांगितले. आयसीआयसीआय प्रूच्या इक्विटी, हायब्रीड अथवा फंड ऑफ फंड योजनेत पूर्वनिर्धारित कालावधीसाठी ही ‘एसआयपी’ सुरू करता येते आणि दरम्यानच्या काळात या एसआयपीमध्ये आकस्मिक खंड पडण्यालाही गुंतवणूकदारांना मुभा मिळते.