गुंतवणूकदारांनी मुदत ठेवींसाठी खासगी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांना पसंती दिल्याचे जानेवारी ते एप्रिल या कालावधीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत समोर आले आहे.

सर्वसाधारणपणे लोकांच्या बचतीचा मोठा हिस्सा खासगी बँकांमध्ये किंवा रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात गेला असता, परंतु रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात एकूण बँक ठेवीत १० टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक वाढ ही राष्ट्रीयीकृत बँकांच्या ठेवीत झाल्याचे ही आकडेवारी सांगते.

राष्ट्रीयीकृत बँकांनी जानेवारी ते मार्च या तिमाहीत आणि एप्रिल महिन्यात ठेवींमध्ये खासगी बँकांच्या तुलनेत मोठी वाढ नोंदविली असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या अनिश्चिततेमुळे सर्वात सुरक्षित पर्याय असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या ठेवींमध्ये मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत ३,००० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक झाली आहे.

सर्वसाधारणपणे खासगी बँका मुदत ठेवींचे आक्रमक विपणन करण्यात माहीर असल्याने गुंतवणुकीचा मोठा हिस्सा खासगी बँकांकडे गेला असता. सध्याच्या अस्थिर वातावरणात खासगी बँकांचे व्याजदर अधिक असूनही राष्ट्रीयीकृत बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पसंती दिली आहे. मागील आठवडय़ात स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी वित्तीय यंत्रणेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक सरकारी बँकांच्या सुरक्षेकडे आल्याने वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये आणि विशेषत: गेल्या वित्त वर्षांच्या चौथ्या तिमाहीत स्टेट बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाल्याचे विधान केले होते. गेल्या आर्थिक वर्षांत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या गोंधळापासून सुरुवात होऊन दिवाण हाऊसिंग फायनान्स, अल्टीको कॅपिटल, येस बँकेपर्यंत सामान्य ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणाऱ्या खासगी, सहकारी बँकांच्या कोसळण्यास सुरुवात झाल्याने सामान्य लोकांनी अधिक व्याजदरांपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देत राष्ट्रीयीकृत बँकांवर पसंतीची मोहर उमटवली आहे.