‘इर्डा’च्या विविध उपाययोजना फलदायी

मुंबई : टाळेबंदी काळात ठप्प झालेल्या व्यवसायास चालना देण्यासाठी भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’ने योजलेल्या उपाय योजनांचा विमा उद्योगाला चांगलाच फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे. विम्याचे प्रथम हप्ता संकलन हा विमा उद्योगातील कामगिरीचा प्रमुख मानदंड समजाला जातो. सामान्य विमा उद्योगाने जून २०२१ अखेर प्रथम हप्ता संकलनात जून २०२० च्या तुलनेत ७ टक्के वाढ साधून करोनापूर्व पातळी गाठली आहे.

करोना आजारसाथीचा परिणाम म्हणून लोकांमध्ये विमाविषयक जागरूकता वाढली आहे, त्याचा परिणाम आयुर्विमा आणि आरोग्य विमा व्यवसायात वाढीतून दिसून येतो. तथापि ‘इर्डा’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२१ मध्ये नवीन हप्ते संकलनात सर्वाधिक वाढ ही आरोग्य आणि अग्नी विमा योजनांच्या हप्त्यांमधील आहे. जून २०२० मध्ये सामान्य विमा उद्योगाने १३,८४२.२ कोटी रुपये हप्त्यापोटी संकलित केले होते, तर जून २०२१ मध्ये संकलनाने १४,८१०.२ कोटी रुपयांचा टप्पा गाठून प्रथम हप्ते संकलन करोनापूर्व पातळीवर पोहचले असल्याचे दर्शविले आहे.

विमा उद्योगात विक्री, सेवा (पॉलिसी दस्तात नामनिर्देशनसारखे बदल) पॉलिसीचे नूतनीकरण आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात वारसांनी केलेल्या दाव्याचे निवारण या महत्त्वाच्या सेवा असतात. या सेवा टाळेबंदीत ठप्प झाल्या होत्या. नियामकांनी केलेल्या सुधारांमुळे, विमा प्रतिनिधीना संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधून विमा अर्ज दाखल करणे आणि विमा कंपन्यासाठी आपल्या ग्राहकांना सेवा देणे शक्य झाले.

दावे स्वीकृती व निवारण हे या काळात विमा उद्योगासमोरचे मोठे आव्हान होते. मात्र विमाधारकाच्या मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र, दाव्याचा अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यास नियामकांनी  मंजुरी दिल्याने दाव्यांची वेगाने स्वीकृती आणि मंजुरी नंतर देय रक्कम वारसांना देणे शक्य झाले,’ अशी प्रतिक्रिया एजीस फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विघ्नेश शहाणे शहाणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.