२.०५ अब्ज डॉलरच्या कर्ज करारात फसवणूक केल्याप्रकरणी सहारा समूह हा मिराचविरुद्ध जाण्यापूर्वीच अमेरिकास्थित मध्यस्थी कंपनीने तब्बल ४० कोटी डॉलरच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. वित्तीय करार करण्यात अपयशी ठरलेल्या सहारामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये अविश्वास निर्माण झाल्यापोटी हा खटला करण्यात येणार असल्याचे मिराचने म्हटले आहे.
मिराच कॅपिटल ही मूळची अमेरिकेतील वित्त सल्लागार कंपनी आहे. सहाराच्या विदेशातील मालमत्ता विक्रीसाठी ती मध्यस्थी म्हणून कार्यरत होती. मात्र तिने याबाबत आपली फसवणूक केल्याने मालमत्ता विक्री न झाल्याने निधी उभारणीही होऊ शकली नाही, असा दावा करत सहारा समूहाने मिराचविरुद्ध फसवणुकीचा दावा करण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. असे असताना सहाराने व्यवहार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मिराचने आता समूहाविरुद्ध तब्बल ४० कोटी डॉलरच्या अब्रुनुकसानीची तयारी सुरू केली आहे. याबाबत लवकरच खटला दाखल करण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. अमेरिकास्थित या कंपनीचा अनिवासी भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी सारांश शर्माविरुद्धही कारवाईचा इशारा समूहाने दिला होता.