अर्थउभारीसाठी उद्योग क्षेत्राला उत्प्रेरकाची अपेक्षा..

नवी दिल्ली : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. विविध क्षेत्राच्या उभारीसाठी सरकार लवकरच साहाय्य करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारताच्या ७३व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या लालकिल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केल्यानंतर पंतप्रधानांनी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित होत्या.

देशातील काही क्षेत्रातील मंदीसदृश स्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत मत व्यक्त करण्यात आल्याचे समजते. अर्थव्यवस्थेला चालना देऊन रोजगार वाढीबाबत काही ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी प्रदर्शित करण्यात आले.

देशातील स्थावर मालमत्ता क्षेत्रानंतर आता वाहन निर्मिती क्षेत्रात मंदीचे सावट आहे. तब्बल १९ वर्षांच्या तळातील वाहन विक्री यंदाच्या जुलैमध्ये नोंदविणाऱ्या या क्षेत्रात बेरोजगारीचे संकटही आले आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातून अप्रत्यक्ष कर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या वित्त वर्षांत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन ६.८ टक्के असे पाच वर्षांच्या तळात पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारातूनही विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला आहे. अर्थस्थितीत सावरत्या महागाईची तेवढी दिलासाजनक कामगिरी आहे. अर्थव्यवस्थेला हातभार म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा सलग चौथी दर कपात केली आहे.

गेल्या तिमाहीत बँकांकडून उद्योगांना होणारा वित्तपुरवठा अवघ्या ६.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर लघुउद्योग क्षेत्राबाबत हे प्रमाण ०.६ टक्के आहे. गृहनिर्माण क्षेत्रातही खरेदी-विक्रीचे व्यवहार काहीसे थांबले आहेत.