गेल्या काही महिन्यांपासून देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च महिन्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्याची रिझर्व्ह बँक तयार अशल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. तसंच अर्थव्यवस्थेतील उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं असं ते म्हणाले. उद्योग संघटना फिक्कीनं बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जीडीपीच्या आकडेवारीवरून करोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला आहे याचे संकेत मिळत असल्याचे दास म्हणाले. “करोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी देशातील नव्या शैक्षणिक धोरणावरही भाष्य केलं. शिक्षण कायमच आर्थिक विकासात आपलं योगदान देतं. त्यामुळे नवं शैक्षणिक धोरण हे ऐतिहासिक आहे आणि नव्या सुधारणांसाठी ते आवश्यकही असल्याचं दास म्हणाले. पर्यटन क्षेत्रा देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचं इंजिन ठरू शकतं. येणाऱ्या काळात याच्या मागणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. अशातच या क्षेत्राला कॅपिटलाईझ करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त लोन रिस्टक्चरिंग स्किम तयार करताना लोकांच्या हितांचं आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा विचार होणं महत्त्वाचं आहे. सुरू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कृषी, उत्पादन या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काळात ती वेगानंही वाढेल. याव्यकतिरिक्त बेरोजगारीही हळूहळू कमी होण्याची शक्यता असून काही क्षेत्रात ती त्या घटही झाल्याचं दास यांनी नमूद केलं.