देशातील निर्मिती क्षेत्र पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ पाहत आहे. जानेवारीतील निर्मिती निर्देशांक ५१.१ वर नोंदला गेला आहे. डिसेंबरमधील ४९.१ तुलनेत समाधानकारक असलेल्या ५० पुढे यंदा क्षेत्राचा प्रवास झाला आहे.

निक्केई आणि मार्किट यांच्यामार्फत केले जाणाऱ्या मासिक खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) सर्वेक्षणानुसार, जानेवारीत देशातील निर्मिती क्षेत्राचा निर्देशाक गेल्या दोन वर्षांत प्रथमच निर्मिती क्षेत्राने सकारात्मक कामगिरी बजाविली आहे.

डिसेंबरमध्ये चेन्नईत आलेल्या पुरामुळे उद्योग क्षेत्रावर संकट उभे राहिले होते. यामुळे या महिन्यातील काही दिवस अनेक कंपन्यांना त्यांचे उत्पादनही बंद ठेवावे लागले. त्याचा फटका देशातील निर्मिती उद्योगाला निर्यात तसेच देशांतर्गक विक्रीतील घसरणीबाबत बसला होता.

महागाईबाबत भाष्य करताना याबाबतच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की, जानेवारीतही महागाईचा दबाव कायम जाणवला आहे. या महिन्याभरात कंपन्या, उद्योगांचा खर्च वाढता राहिला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणाबाबत, महागाईचा वरचा स्तर पाहता यंदा व्याजदर कपात होण्याबाबत शंका आहे, असे  अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेव्हा यंदाही रेपो दर ६.७५ टक्केच राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर (-)०.७३ टक्के असा वाढता राहिला होता. तर किरकोळ महागाई दर ५.६१ टक्क्य़ांवर गेला होता. चालू, २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी सरकारने देशाच्या आर्थिक विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के अंदाजित केला आहे.

भारतीय निर्मिती क्षेत्राचा प्रवास पुन्हा एकदा रुळावर येत असल्याचे याबाबतच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. देशातील कंपन्यांचे देशांतर्गत तसेच निर्यात क्षेत्रातील योगदान यंदा वाढल्याचे जाणवते.

– पॉलिआना डे लिमा,  अर्थतज्ज्ञ, मार्किट.