निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीपोटी मेमधील देशाचा औद्योगिक उत्पादन दर २.७ टक्क्य़ांवर आला आहे. वर्षभरापूर्वीच्या ५.६ टक्क्य़ांवरून हे प्रमाण निम्म्यावर आले, तर महिन्यांपूर्वीच्या म्हणजे एप्रिल २०१५ मधील सुधारीत ३.३ टक्क्य़ांच्या तुलनेतही लक्षणीय घसरले आहे.

कमालीच्या घसरत्या औद्योगिक उत्पादन दरामुळे अर्थस्थितीचे निराशाजनक चित्र समोर आले असून, रिझव्र्ह बँकेकडून आता पुन्हा (४ ऑगस्ट) एकदा व्याजदर कपातीसाठी अपेक्षा केली जात आहे.
देशाचा एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन दर आधी जाहीर केलेल्या ४.१ टक्क्य़ांवरून सुधारून ३.३ टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यातील दर ३ टक्के राहिला आहे. एप्रिल व मे २०१५ मध्ये हा दर ४.६ टक्के होता.
मेमधील निर्मिती क्षेत्राची वाढ २.२ टक्के राहिली आहे. वर्षभरापूर्वी ती तब्बल ५.९ टक्के होती. तर ऊर्जा क्षेत्राची वाढही वर्षभरापूर्वीच्या ६.७ टक्क्य़ांवरून मे २०१५ मध्ये ६ टक्क्य़ांवर आली आहे.
भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू तसेच बिगर ग्राहकोपयोगी वस्तू यांची वाढही यंदा कमी झाली आहे. ती यंदा अनुक्रमे १.६, ३.९ व ०.१ टक्के झाली आहे. खनीकर्म क्षेत्राची वाढ मात्र मे २०१४च्या २.५ टक्क्य़ांवरून यंदा किरकोळ अधिक, २.८ टक्के टक्क्य़ांपर्यंत पोहोचू शकली आहे.
औद्योगिक क्षेत्राची वाढ मंदावली असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत्या महिन्यातील पतधोरणात रिझव्र्ह बँकेने व्याजदर कपात करावी, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्राने व्यक्त केली आहे.
एम्के ग्लोबल फायनान्शिअल सव्र्हिसेसचे अर्थतज्ज्ञ व धोरणकर्ते धनंजय सिन्हा यांनी, केवळ वर्षभरापूर्वीच्या तुलनेतच नव्हे तर एप्रिलच्या (३.३%) तुलनेतही दर घसरला आहे; ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती यंदा रोडावल्याचे त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील कमी मागणी आणि सरकारच्या कमी महसुली खर्चापोटी हे घडल्याचे त्यांनी सांगितले.
झायफिन रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देबोपम चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक उत्पादनाचा दर जानेवारीपासून सरासरी ३ टक्के राहिला आहे. देशांतर्गत वातावरण काहीसे सकारात्मक राहिले, तरी एकूण अर्थव्यवस्थेतील अंधुकता कायम राहण्याची शक्यताही आहे.