डिसेंबरमध्ये दोन वर्षांतील उच्चांकी टप्प्यावर पोहोचलेली देशातील निर्मिती क्षेत्राची वाढ २०१५ च्या सुरुवातीला मात्र मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. ‘एचएसबीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात जानेवारीमधील निर्मिती क्षेत्राची वाढ ५२.९ टक्के झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राने दोन वर्षांतील सर्वोच्च टप्पा राखला होता. आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेच्या दाव्यानुसार ती यादरम्यान ५४.५ टक्के होती. ५० टक्के हे प्रमाण या क्षेत्राच्या विकासासाठी समाधानाचे मानले जाते.
जानेवारीमधील हे चित्र क्षेत्राला पुन्हा रुळावर आणण्यास प्रोत्साहन देणारे आहे, असे एचएसबीसीचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी म्हटले आहे. उद्योग क्षेत्राची संथ वाढ हे रिझव्र्ह बँकेच्या व्याज दरकपातीसाठी पूरक असल्याचे मानले जात आहे. महागाई कमी होत असताना उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी रिझव्र्ह बँकेकडून व्याज दरकपात अनिवार्य समजली जात आहे.