मुंबई : सलग चार सत्रांमधील निर्देशांकांच्या मुसंडीला, मंगळवारी भांडवली बाजारात नफावसुलीच्या परिणामी झालेल्या घसरणीने खंड पाडला. खनिज तेलासह, पोलाद व अन्य धातूंसारख्या प्रमुख जिनसांच्या किमती वाढल्याने महागाई भडकण्याच्या भीतीने जगभरात सर्वत्रच गुंतवणूकदारांनी विक्रीचा मार्ग स्वीकारल्याचे प्रतिबिंब भारताच्या बाजारातही उमटले.

सप्ताहाभरापासून वधारत असलेल्या धातू, बँका व वित्तीय समभागांची वरच्या मूल्य स्तरावर विक्री करून नफा पदरी बांधून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी मंगळवारी स्वीकारले. व्यवहाराची सुरुवात नकारात्मक पातळीवरून करणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारचे व्यवहार थंडावले तेव्हा ३४०.६० अंशांच्या नुकसानीसह ४९,१६१.८१ पातळीपर्यंत घसरण दाखविली. त्याचबरोबरीने निफ्टी निर्देशांकाने ९१.६० अंशांच्या तोट्यासह १४,८५०.७५ या पातळीवर दिवसाला निरोप दिला.

कोटक बँक हा सेन्सेक्समधील सर्वाधिक तीन टक्क्यांच्या घरात नुकसान सोसणारा समभाग ठरला. त्या खालोखाल एचडीएफसी, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्र्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर, अ‍ॅक्सिस बँक हे समभाग घसरणीत राहिले.