रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कमी करण्यास पोषक वातावरण तयार करणाऱ्या अर्थव्यवस्थेशी निगडित आकडेवारीवर नफेखोरी साधत गुंतवणूकदारांनी मंगळवारी प्रमुख भांडवली बाजाराला त्यांच्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावरून खाली खेचले. १५०.७७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,७०५.९३ पर्यंत तर ४३.१५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८२९.१० वर स्थिरावला.
आशियाई तसेच अन्य जागतिक भांडवली बाजारातील घसरत्या वातावरणाचाही येथे परिणाम जाणवला. चीनमधील शांघाय निर्देशांकाने तर मंगळवारी ३,००० हा अनोखा टप्पाही सोडला. चीनमधील बाजारातील गैरव्यवहारांच्या चर्चेने एकूण आशियाई बाजारात मंगळवारचा दिवस नोंदला गेला.
ऑगस्टमधील घसरत्या घाऊक तसेच किरकोळ महागाई दरामुळे सप्ताहाच्या सुरुवातीलाच बाजारात तेजीचे व्यवहार नोंदले गेले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या महिनाअखेरच्या व्याजदर कपातीच्या अंदाजामुळे सेन्सेक्ससह निफ्टी पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले होते. ही वाढ मंगळवारी नफेखोरीचे रूप घेणारी ठरली.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने व्यवहारात २५,६४९.३७ हा सत्रातील तळ राखला. तर दिवसात तो २५,९०९.८३ पर्यंत पोहोचू शकला. निफ्टीने सत्रात ७,८००चा स्तर गाठला होता. ७,८८० पर्यंत पोहोचल्यानंतर त्याने सत्रात ७,७९९.७५ पर्यंत घसरण नोंदविली.