भारतीय आयुर्विमा मंडळाने (एलआयसी) ‘सेन्सेक्स’मधील कंपन्यांतील गुंतवणूक विकून नफा कमविण्याचे २०१३ सालात सुरू केलेले धोरण सुरूच ठेवले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये सार्वजनिक कंपन्यांच्या भागविक्रीत सहभागी होत विविध कंपन्यांमधील एलआयसीची गुंतवणूक ९ हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’मधील सध्या बाजारमूल्याच्या बाबत क्रमांक एकवर असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीसह राष्ट्रीयकृत स्टेट बँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक या खासगी बँका, टाटा समूहातील टाटा मोटर्स व टाटा स्टील यांच्यासह १७ कंपन्यांमध्ये एलआयसीने मिळून ८,८६५ कोटी रुपये किंमतीचे समभाग विकले. तर एनटीपीसी, कोल इंडिया, हीरो मोटोकोर्प या कंपन्यामध्ये एलआयसीने आपला हिस्सा २०११-१२ मधील शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत १% हून अधिक वाढवला. कंपनीने ६,२०० कोटी मूल्याचे ‘सेन्सेक्स’मधील कंपन्याचे समभाग खरेदी केले. तर एचडीएफसी, आयटीसी, गेल या मुख्य निर्देशांकातील कंपन्यांमधील हिस्सा १% टक्क्यांपर्यंत वाढवला. भेल व स्टरलाईट यांच्या भांडवली हिश्श्यात मात्र कोणताच बदल केला नाही; तर जिंदाल पॉवर अ‍ॅन्ड स्टीलमधील सर्व समभाग विकून टाकले आहेत. इन्फोसिसमध्ये भांडवली हिस्सा १% कमी करून एलआयसीने पुन्हा एकदा या क्षेत्रातील कसलेला खेळाडू असल्याचे सिद्ध केले. गेल्या जून-जुल २०१२ मध्ये इन्फोसिसबद्दल बद्दल नकारात्मक वातावरण असताना या कंपनीच्या समभागांमध्ये ‘चेरी पिकिंग’ केलेल्या एलआयसीने डिसेंबर २०१२ मध्ये इन्फोसिसमधील सतत विक्रीचे धोरण अवलंबून नफ्याची वसुली केली होती.