गुंतवणूकदारांनी सरलेल्या ऑगस्ट महिन्यात मल्टीकॅप आणि लार्ज कॅप फंडात मोठय़ा प्रमाणावर नफावसुली केल्याने सलग पाचव्या महिन्यांत समभागसंलग्न गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया -अ‍ॅम्फीने ही आकडेवारी जाहीर करताना, नफावसुलीचा हा प्रवाह येत्या डिसेंबपर्यंत सुरू राहण्याचा संकेतही दिला आहे.

‘अ‍ॅम्फी’कडून ऑगस्ट महिन्याची आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. गुंतवणूकदारांनी या महिन्यात समभागसंलग्न फंडातून ३,९९९.६२ कोटी रुपये काढून घेतले. जुलै महिन्यांतही २,४८०.३५ कोटी रुपयांची निर्गुतवणूक या फंड वर्गवारीने सोसली आहे. सर्वच फंड गटातून गुंतवणूक काढून घेतल्याचे समोर आले असून सर्वाधिक घट मल्टीकॅप आणि लार्ज कॅप फंडाच्या मालमत्तेत झाली आहे.

रोखे आणि समभागसंलग्न फंड मिळून एकूण १८,५५७ कोटी रुपये म्युच्युअल फंड मालमत्तेतून गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये काढून घेतले आहेत. म्युच्युअल फंड मालमत्ता आवक कोविडपूर्व पातळीवर येण्यास आणखी एक तिमाही वाट पाहावी लागेल असे अम्फीचे मुख्य कार्यकारी एन. वेंकटेश यांनी सांगितले.

ऑगस्टअखेर देशातील सर्व म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण मालमत्ता २७.४९ लाख कोटीवर स्थिरावल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

फंड गुंतवणूकदारांमध्ये सर्वच फंड प्रकारात ऑगस्ट महिन्यांत निधी काढून घेण्याचा कल दिसला. याचा सर्वाधिक फटका मल्टीकॅप फंडांना बसला. अपवादात्मक बाब म्हणून सेक्टोरल फंडात ३७० कोटी रुपयांची आवक वाढलेली दिसत असून वैविध्यापेक्षा सेक्टोरल फंडात गुंतविण्याचा धोका गुंतवणूकदार पत्करत असल्याचेही दिसते.

– श्रीकांत मीनाक्षी, सह संस्थापक प्राईमइन्व्हेस्टर

फोकस्ड फंडाची स्थिर कामगिरी

मुंबई: भांडवली बाजार मार्चमध्ये दिसलेल्या घसरणीतून सावरले आहेत आणि टाळेबंदी उठून विविध व्यवसायही सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत फोकस्ड फंडात गुंतलेला पैसा गुंतवणूकदारांसाठी चांगला फायद्यचा ठरला आहे. किंबहुना अस्थिर बाजारात या म्युच्युअल फंड वर्गवारीचा वार्षिक परतावा (ऑगस्ट ते जुलै) ७. ८७ टक्के असा आहे, त्या उलट एसअँडपी बीएसई ५०० टीआरई या मानदंड निर्देशांकाचा परतावा ६.१२ टक्के आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड फंडाने एका वर्षांत ११.७३ टक्के परतावा दिला आहे. कोटक फोकस्ड इक्विटी फंडाने ४.१५ टक्के, बिर्ला सनलाइफ फोकस्ड इक्विटी फंडाने ६.८५ टक्के तर एसबीआय फोकस्ड फंडाने १०.२९ टक्के परतावा दिला आहे.

यावर्षी जानेवारी ते २० ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड फंडाने ८.२८ टक्के परतावा दिला आहे. याच मानदंड निर्देशांकाने -४.०२ टक्के आणि फंड वर्गवारीने -३.८२ टक्कय़ांचे नुकसान सहन केले आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडात जास्तीत जास्त ३० समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फोकस्ड इक्विटी फंडांची श्रेणी गुंतवणूकदारांच्या पसंतीची आहे. आयसीआयम्सीआय प्रु. फोकस्ड फंडाचे व्यवस्थापक मृणाल सिंग हे मूल्यकेंद्रित समभाग निवडीसाठी परिचित असून, त्यांनी तयार केलेला बळकट समभागसंच परतावादृष्टय़ाही सरस ठरला आहे.