एप्रिलअखेर कर्जभार २.७५ लाख कोटींवर

मुंबई : मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध ५,०४३ कंपन्यांपैकी ३,१४२ कंपन्यांच्या (६२.३ टक्के) प्रवर्तकांनी आपल्याच कंपनीचे समभाग गहाण ठेवून त्या बदल्यात २.५७ लाख रुपयांचे कर्ज उभारले आहे. एप्रिलअखेर त्यात महिनागणिक ७.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

अनेक कंपन्यांचे प्रवर्तक हे कंपनीच्या व्यावसायिक विस्तार अथवा नव्या प्रकल्पासाठी आवश्यक निधी हे त्यांच्याकडील समभाग गहाण ठेवून मिळवितात. परंतु अशा गहाणवट समभागांचे प्रमाण काही कंपन्यांच्या प्रवर्तकांबाबत ९० ते १०० टक्क्यांपर्यंत गेले आहे. तेजीच्या बाजारात हे खपवून घेतले जात असले, तरी बाजारात पडझड सुरू झाल्यास ते भागधारकांसाठी मारक ठरते. समभागांच्या घसरलेल्या मूल्यानुरूप तफावतीची रक्कम (एमटूएम) भरून काढण्याचा ताण प्रवर्तकांवर धनकोंकडून येतो आणि त्याची पूर्तता न केल्यास गहाण समभागांची विक्री अथवा जप्ती आफत येऊन कंपनीची मालकी दुसऱ्या हाती जाण्याचा धोका असतो. उल्लेखनीय वाजवीपेक्षा अधिक गहाणवट समभागांचे प्रमाण असलेल्या या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल तब्बल १५२ लाख कोटी रुपयांचे आहे. सध्या तीन कंपन्यांच्या प्रवर्तकांचे ९० टक्क्यांहून अधिक समभाग गहाण आहेत, तर प्रवर्तकांचे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत समभाग गहाण असलेल्या कंपन्यांची संख्या ८१ हून अधिक आहे. गुंतवणूकदारांसाठी अशा कंपन्यांची नावे आणि माहिती बीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.