झपाटय़ाने विकसित होत असलेले जागतिक शहर मुंबईत घरांच्या मागणीचा कल  विविध उत्पन्नस्तरांकडून व्यापक श्रेणीत होत असला तरी देशभरातून येथे रोजगारासाठी येणाऱ्यांच्या संख्येत तसेच स्थानिकांच्या लोकसंख्येतील वाढीचे प्रमाण पाहता, निम्न उत्पन्नस्तरासाठी छोटी, एक-दोन बीएचके घरांच्या मागणीचे प्रमाण प्रचंड मोठे आहे. या आर्थिक स्तरातील मंडळींना घर खरेदी सोपी व्हावी, असा प्रयत्न सुरू असल्याचे ‘एमसीएचआय’ व ‘क्रेडाई’ या बांधकाम विकसकांच्या संघटनांनी स्पष्ट केले.
घरांचे स्वप्न बाळगणाऱ्या मध्यम व निम्नस्तरातील लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या उद्देशानेच पुढील आठवडय़ात ‘एमसीएचआय-क्रेडाई’चे आजवरचे सर्वात मोठे बांधकाम मालमत्ता व गृहवित्त प्रदर्शन मुंबईत आयोजण्यात आले आहे. ‘जिथे सारी स्वप्नं सत्यात उतरतात’ हे ब्रीद घेऊनच ‘प्रॉपर्टी २०१३’चे ११ ते १४ एप्रिल या कालावधीत वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजन केले गेले आहे, असे प्रदर्शन आयोजन समितीचे अध्यक्ष बंदीश अजमेरा यांनी सांगितले.
जागतिक दर्जाच्या सोईसुविधांची अनुभूती देणारी आलिशान अपार्टमेंट्स, डुप्लेक्स, पेंटहाऊस, रो हाऊसेस ते १-२ बीएचके घरे, शॉप-ऑफिसेससाठी जागा अशा सर्व प्रकारच्या मुंबई महानगर क्षेत्रातील १०२ बांधकाम विकसकांच्या १२ हजारांहून अधिक मालमत्ता या प्रदर्शनात असतील. शिवाय स्टेट बँक, एचडीएफसी लि., पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अशी तात्काळ गृहवित्ताला मंजुरी देणारी बँका व वित्तसंस्थांची दालने या प्रदर्शनात असतील.