गुंतवणूक फराळ

मागील दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत बाजारासाठी सकारात्मक अनेक गोष्टी घडल्या. सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे पावसाने केलेली कृपा.

सततच्या दोन वर्षांच्या अवर्षणानंतर या वर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अन्नधान्याची महागाई कमी होणार असल्याच्या अपेक्षेने या महिन्याच्या आरंभी रिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दरात पाव टक्के कपात करून अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास आज जगातील तीनपैकी एक अर्थव्यवस्था उणे व्याज दराच्या छायेत आहे.

जिनसांच्या किमतीतील घट मागील वर्षांपासून सुरूच असल्याने अर्थव्यवस्थेचा कल हा जिन्नस निर्यातदारांकडून जिन्नस आयातदारांकडे झुकणे पुढील वर्षीदेखील सुरू राहील. आपली अर्थव्यवस्था जिन्नस आयातदार असल्याने अर्थपरिमाणे भारतासाठी सकारात्मक राहिलेली आहेत. जिनसांच्या किमतीतील घट भारताच्या पथ्यावर पडली असून सरकारने अनुदानापोटी वाचवलेला पैसा हा रस्ते व रेल्वे या सार्वजनिक वापराच्या क्षमता वाढविण्यासाठी वापरला असल्याचे दिसून येते.

मागील अठरा महिन्यांपासून पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च करून सरकार एका अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. या सर्व गोष्टींचा परिमाण पुढील दिवाळीदरम्यान दिसणार असल्याने आम्ही अनेक उद्योग क्षेत्रांच्या बाबतीत सकारात्मक आहोत. अर्थव्यवस्था लोकांनी व सरकारने खर्च केल्यानेच वाढते. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ‘सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ झाला आहे. तसेच उत्तम पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. हा लाभ या कर्मचाऱ्यांकडून व ग्रामीण जनतेकडून त्यांच्या वापराच्या विविध वस्तूंच्या खरेदीवर खर्च होणे अपेक्षित आहे.

  •  लोकांच्या हाती येणारा वाढीव पैसा सर्वसाधारण गृहसजावट दुचाकी वाहने व प्रवासी वाहने सजावटीसाठीचे रंग यावर खर्च होणे अपेक्षित असल्याने साधारण पुढील वर्षांच्या पहिल्या तिमाहीपासून या क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणे अपेक्षित आहे.
  • सरकारकडून ज्या कंपन्यांना रस्ते बांधकामाची कामे मिळत आहेत. त्यापैकी निवडक कंपन्यांच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत तसेच सरकारी खर्चाच्या लाभार्थी कंपन्या या रेल्वेशी संबंधित कंपन्या असून आमच्या गुंतवणुकीत या कंपन्यांना आम्ही स्थान दिलेले आहे.

थोडक्यात अनेक वर्षांनतर एकाच वेळी अनेक उद्योग क्षेत्रांना भरभराटीचे दिवस दिसावेत, अशी ही दिवाळी आहे.