संयुक्त राष्ट्र : स्वयंचलितीकरण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे तंत्रज्ञानातील बदल हे ज्या गतीने नोकऱ्यांवर गदा आणत आहेत, ते पाहता कितीही बचावात्मक धोरणे घेतली तरी त्यातून नोकऱ्यांवरील गंडांतर रोखता येणे अवघड आहे, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रतिपादन केले. हे बदल आणि जागतिकीकरणाच्या परिणामांना जो लोकशाही प्रतिरोध होत आहे, त्याकडे विशेषत: औद्योगिक आणि विकसनशील राष्ट्रांना दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी बजावले.

दुसऱ्या महायुद्धापश्चात सहा दशकांत जगाने ज्या उदार लोकशाही बाजारप्रणालीतून भरघोस समृद्धी अनुभवली ती बाजारप्रणालीच आज टीकेची धनी बनली आहे, असे राजन यांनी संयुक्तराष्ट्र मुख्यालयात ‘इकोसॉक फोरम ऑन फायनान्सिंग फॉर डेव्हलपमेंट’ विषयावर आयोजित परिषदेत बीजभाषण करताना सांगितले.

उल्लेखनीय म्हणजे या उदार बाजारव्यवस्थेवरील टीकाकार हे परिचित अर्थ-चिकित्सक अथवा डावे नेते नाहीत, तर त्याऐवजी मुक्त व्यवस्थेचे लाभार्थी ठरलेले जगातील समृद्ध राष्ट्रातीलच हे टीकाकार आहेत. हीच मंडळी आज संरक्षणात्मक धोरणे आणि बंदिस्त व्यवस्थेचा पुरस्कार करीत आहेत, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.